कारखान्यांनी उपपदार्थांच्या निर्मितीवर भर द्यावा : पीयूष गोयल

साखर उद्योगाकडून किमान साखर विक्री मूल्यात (एमएसपी) वाढ करण्याची आग्रही मागणी साखर कारखानदारांकडून करण्यात येत आहे.
piyush goyal
piyush goyal

कोल्हापूर : साखर उद्योगाकडून किमान साखर विक्री मूल्यात (एमएसपी) वाढ करण्याची आग्रही मागणी साखर कारखानदारांकडून करण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल यांनी मात्र थेट नकार दर्शवीत कारखान्यांनी साखरे शिवाय अन्य उप पदार्थांच्या उत्पन्नावर अधिक लक्ष द्यावे. हे उप पदार्थच कारखान्यांना फायदेशीर ठरतील, असे सांगत एमएसपी वाढीबाबत केंद्र सकारात्मक नसल्याचे स्पष्ट केले आहे.   इंडियन शुगर मिल्सच्या (इस्मा) वार्षिक सभेत त्यांनी साखर उद्योगाला कानपिचक्या देताना उद्योगाने केवळ साखरेवर अवलंबून राहू नये. तांत्रिक सुधारणांसह इथेनॉल उत्पादनासारख्या फायदेशीर बाबीकडे लक्ष द्यावे, असे म्हटले आहे. गोयल म्हणाले, ‘‘साखरेची किंमत आणि एफआरपी याची सांगड करणे शक्य नाही. एफआरपी वाढली म्हणून साखरेची किंमत वाढली पाहिजे असेही नाही. काही कारखाने साखरेची किंमत वाढत नसेल तर एफआरपी कमी करा, अशी मागणी करीत आहे. हे चुकीचे आहे. कोणत्याही परिस्थितीत एफआरपी कमी केली जाणार नाही. साखरेची किंमत वाढविण्याबाबत मी फार अनुकूल नाही. सध्या आपल्याकडे पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जाते. त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ब्राझील सारख्या देशात इथेनॉलचा वापर ९० टक्यापर्यंत केला जातो, याकडे आपण का पाहात नाही. साखर उद्योग हा देशातील महत्त्वाचा उद्योग आहे. त्यामुळे केवळ सरकारच्या अनुदानावरच प्रगती करावी, हे अपेक्षित नाही. शेतकऱ्यांची देणी भागविण्यासाठी शासन मदत करेल. पण उद्योग स्वयंपूर्ण बनविण्याची जबाबदारी कारखान्यांचीही आहे आणि त्या दृष्टीनेच त्यांनी खर्च कमी करून नफ्याच्या दृष्टीने वाटचाल करावी. इस्माने अशा उपायांवर अभ्यास करावा.’’

केंद्र `एमएसपी` वाढीला अनुकूल : नाईकनवरे `एमएसपी` वाढीबाबतच्या गोयल यांच्या विधानाबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, ‘‘एमएसपी` वाढीचा प्रस्ताव या पूर्वीच मंत्रिमंडळापुढे गेला आहे. यामुळे गोयल यांचा दृष्टिकोन हा फारसा महत्त्वाचा ठरणार नाही. केंद्र एमएसपी वाढीबाबत सकारात्मक आहे. लवकरच या बाबत घोषणा होणे अपेक्षित आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com