साखर कारखान्याने करणार ऑक्सिजन निर्मिती

ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. यावर मात करण्यासाठी व उद्‍भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती व पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ‘व्हीएसआय’ने सुचविले आहे.
The sugar factory will produce oxygen
The sugar factory will produce oxygen

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. यावर मात करण्यासाठी व उद्‍भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती व पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ‘व्हीएसआय’ने सुचविले आहे. 

सद्यःस्थितीत ऑक्सिजन ननिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी येणारा खर्च, कालावधी, होणारा फायदा हे पाहता किती साखर कारखाने पुढाकार घेतील हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. मात्र आर्थिक अडचणीत आलेल्या कारखान्यांनी पुढाकार घेतल्यास काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना या अनुषंगाने एक पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे. सद्यःस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी असे निर्देशित केले आहे, की ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे. तसेच ज्यांचे सहवीजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत, अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी. 

राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल, वीजनिर्मिती असे विविध प्रकल्प सुरू केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कारखान्यांना फायदा झाला असून, शेतकऱ्यांच्या उसालाही बऱ्यापैकी चांगले दर मिळू लागले आहेत. मात्र आता पुन्हा आॅक्सिजननिर्मिती करण्यावर कारखान्यांनी भर देण्याचे शरद पवार यांनी आवाहन केले आहे. 

सध्या ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे, अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल. ऑक्सिजननिर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचा झाल्यास त्यासाठी वाफ व विजेची गरज भासते. साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज ही कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजननिर्मितीचे प्रकल्प उभारणी हाती घ्यावेत. त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुद्धा कमी होईल. सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. 

राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तथापि, आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवनी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बन डायऑक्साइड वेगळा करण्याचा अनुभव आहे. या ठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन त्वरित कार्यवाही करावी. या अनुषंगाने सर्व कारखान्यांनी आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजननिर्मिती व पुरवठा करावा. 

कोरोनाची सद्यःस्थिती पाहता आॅक्सिजनचा तुटवडा भासत आहे, हे खरे आहे. त्याबाबत व्हीएसआयने आॅक्सिजननिर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु ज्या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे कारखाने सहभागी होऊ शकतात.  - शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे 

कोरोना रुग्णांसाठी आॅक्सिजनची खूपच गरज आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साखर कारखान्यांना आॅक्सिजननिर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. त्याला सर्व साखर कारखान्यांनी प्रतिसाद देऊन प्रकल्प उभे करावेत. ज्या कारखान्याला अडचणी नाहीत, त्यांनी तातडीने पुढाकार घ्यावा. ज्या कारखान्याकडे अडचणी आहेत, त्यांनी राज्य बॅंकेची मदत घेतली पाहिजे.  - अशोक पवार, अध्यक्ष, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, न्हावरे, शिरूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com