राज्यात साखरेचा महापूर

राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर शिल्लक असताना यंदाचा हंगाम आता विक्रमी साखर उत्पादनाकडे वाटचाल करीत आहे.
Sugar
Sugar

पुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर शिल्लक असताना यंदाचा हंगाम आता विक्रमी साखर उत्पादनाकडे वाटचाल करीत आहे. यामुळे साखरेचा ‘महापूर’ साखर कारखान्यांची आर्थिक गणिते विस्कळीत करण्याची चिन्हे आहेत. 

डिसेंबरअखेर सर्वांत जास्त शिल्लक साखर कोल्हापूर आणि पुणे विभागात होती. ती अनुक्रमे १४.१६ लाख टन व १५.९१ लाख टन होती. कारखान्यांमध्ये भरमसाट साखर पडून असल्याचे पाहून देशी बाजारातील व्यापारी किंवा उद्योग क्षेत्राला चिंता राहिलेली नाही. त्यामुळे साखरेला मागणी राहिलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे भाव कमी करूनही साखर घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असे कारखान्यांचे म्हणणे आहे.  केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) ३१०० रुपये दर सध्या ठेवला आहे. सध्या चांगली व नवी साखर २९५० रुपये दराने काही व्यापारी घेत आहेत. पण हे दर देखील घसरण्याची चिन्हे आहेत. कारण साखर कारखान्यांनी आतापर्यंत गाळलेल्या ५३४ लाख टन उसापासून ५२.४७ लाख टन साखर तयार केली आहे. राज्यातील कारखान्यांकडे अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस गाळणार आहे.  शेतकऱ्यांकडे सध्या उभा असलेला ऊस गाळल्यास आणखी ५० लाख टनापेक्षा जास्त साखर पुढील १२० दिवसांत तयार होईल. त्यामुळेच राज्य व केंद्र सरकारला यंदा अतिशय बारकाईने नियोजन करावे लागेल. त्यानंतरच साखरेचा महापूर नियंत्रित होण्याची शक्यता आहे. 

‘‘साखरेचे साठे जसजसे वाढत जातील त्याप्रमाणे बाजारातील साखरेची दर कमी होत २७०० पर्यंत जाण्याची स्थिती यंदा आहे. यात सरकारने काही मार्ग काढून मोठ्या प्रमाणात साखर निर्यात केल्यास स्थिती किंचित बदलू शकेल. तसे न झाल्यास साखरेच्या महापुराचे संकट अटळ आहे,’’ असे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.  व्यापाऱ्यांकडेही साखर पडून देशातील व्यापाऱ्यांकडे अंदाजे ३५ लाख टन साखर आहे. व्यापाऱ्यांचा पैसा अडकून पडल्याने जुनी साखर १८५० रुपये क्विंटल दराने विकण्याची त्यांची धडपड आहे. मात्र जुनी साखर घेण्यास शीतपेय उद्योग किंवा प्रक्रिया उद्योग नाखुश आहेत. अशा स्थितीत आम्ही सध्याची ३१०० रुपये दराची साखर विकत घेणार नाही, अशी माहिती एका बड्या साखर व्यापाऱ्याने ‘अग्रोवन’शी बोलताना दिली. 

साखर उत्पादनाची स्थिती  गेल्या वर्षीची शिल्लक साखर ः ३६ लाख टन   ऑक्टोबर २० ते ३१ डिसेंबरदरम्यान तयार साखर ः ३६.३५ लाख टन  ऑक्टोबर २० ते ३१ डिसेंबरदरम्यान विकलेली साखर ः १५.८० लाख टन ऑक्टोबर २० अखेर गोदामातील साखर ः ५६.७२ लाख टन  चालू हंगामात तयार झालेली साखर ः ५२.४७ लाख टन  गेल्या हंगामातील एकूण साखर उत्पादन ः ६१.६१ लाख टन   चालू हंगामात होणारे साखर उत्पादन ः ९९ लाख टन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com