सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या मुख्य पिकांन
अॅग्रो विशेष
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती
मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर कारखान्यांनी यांत्रिकी कामांवर भर दिला आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊस वाहतुकीसाठी ‘बैलगाडी’ऐवजी ‘ट्रॅक्टर ट्रॉली’च्या वापरात मोठी वाढ झाली आहे.
पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर कारखान्यांनी यांत्रिकी कामांवर भर दिला आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊस वाहतुकीसाठी ‘बैलगाडी’ऐवजी ‘ट्रॅक्टर ट्रॉली’च्या वापरात मोठी वाढ झाली आहे. तर ऊस तोडणीसाठी ‘शुगरकेन हार्वेस्टर’ची संख्या आता ८०८ पर्यंत गेली आहे.
साखर कारखान्यांच्या म्हणण्यानुसार, कोविड १९ नंतर तयार झालेली आपत्कालीन स्थिती ही ऊसतोडणी व वाहतुकीमध्ये यांत्रिकीकारणाला चालना देणारी ठरली आहे. तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग लागतो. चालू हंगामात लागवडी चांगल्या होत्या. मात्र, बेमोसमी पावसामुळे मजुरांकरवी ऊस तोडणी आणि बैलगाड्यांच्या माध्यमातून वाहतुकीला मर्यादा आल्या. त्यामुळे हार्वेस्टर व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या वापरात यंदा लक्षणिय वाढ झाली आहे.
तोडणीसाठी मजूर वेळेवर उपलब्ध होतील की नाही याची शाश्वती महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांना सतत वाटत असते. त्यामुळे या राज्यांमधून हार्वेस्टरला मागणी वाढते आहे. ‘‘येत्या दहा वर्षांच्या आत देशातील बहुतेक कारखाने तोडणीची कामे हार्वेस्टरवर आणतील,’’ असे हार्वेस्टर कंपन्यांच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
चालू हंगामात किमान ११ टक्के ऊस कापणी हार्वेस्टरच्या मदतीने होईल, असा अंदाज आहे. राज्यात किमान १५ लाख ऊस तोडणी कामगार आहेत. स्वयंचलित ऊस तोडणी यंत्रे वाढल्यास त्याचा थेट परिणाम कामगारांवर होईल, असा दावा ऊस तोडणी कामगारांच्या संघटनांचा आहे.
यंदा ऊसतोडणीसाठी ‘शक्तिमान’ आणि ‘न्यू हॉलंड’ या दोन कंपन्यांचे हार्वेस्टर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ‘न्यू हॉलंड’ने २०१८ मध्ये कारखान्यांना १२५ हार्वेस्टर पुरविले होते. यंदा दोन्ही कंपन्यांनी ६०० हार्वेस्टर विकण्याची तयार केली होती.
--------------
चौकट
हार्वेस्टर व्यावसायिकांचा उदय
हार्वेस्टर व्यवसायात एक ते दीड कोटी रुपये गुंतवावे लागतात. त्यामुळे कर्ज काढून हार्वेस्टर घेतले जाते. त्यासाठी बॅंका, हार्वेस्टर कंपन्या आणि कारखाने परस्परपूरक मदतीची भूमिका घेताना दिसतात. विशेष म्हणजे कर्ज काढून हार्वेस्टर व्यवसायात उतरण्यात आता शेतकऱ्यांची मुले आघाडीवर आहेत. ‘‘कारखान्यांशी करार केल्यास हार्वेस्टरच्या माध्यमातून तोडणीची कामे मिळतात. त्यामुळे हार्वेस्टर व्यावसायिकांचा एक नवा वर्ग आता साखर उद्योगाला उदयाला आला आहे,’’ अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
-----------------
कोट
राज्यातील साखर कारखान्यांचा यांत्रिकीकरणाकडे यंदा असलेला ओढा लक्षणिय आहे. कारण, हार्वेस्टरची संख्या ८०० पेक्षा जास्त झाली असून बैलगाड्यांचा वापर देखील घटला आहे. पुढील काही वर्षात ऊस वाहतुकीमधील बैलगाड्यांचा वापर थांबून त्याची जागा ट्रॅक्टर ट्रॉली घेईल, असा अंदाज आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त.
- 1 of 655
- ››