ईशान्यकडील राज्ये का नाकारतात महाराष्ट्राची साखर? नक्की वाचा

साखर हंगामाचे दुष्टचक्र याही हंगामात कायम आहे. शिल्लक साखर, एक रकमी एकरकमी एफआरपीचा दबाव कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात आहे. यंदाचा हंगाम गेल्या वर्षीपेक्षा कमी असूनही तो खडतर असेल हे चित्र आताच स्पष्ट झाले आहे. - विजय औताडे, साखर तज्ज्ञ, कोल्हापूर
sugar costly for north-east India
sugar costly for north-east India

कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने राज्यातील साखरेला ईशान्य भागातून मागणी कमी झाल्याने यंदा तब्बल ५५ लाख टनाहून अधिक साखर शिल्लक राहिली आहे. या राज्यांकडून होणारी साखरेची खरेदी थंडावल्याने महाराष्ट्रातील कारखानदार हतबल झालेत. बहुतांशी कारखान्यांची जवळपास निम्मी साखर शिल्लक आहे. याचा विपरीत परिणाम आर्थिक उलाढालीवर होत आहे. याचे सगळे पडसाद शेतकऱ्यांच्या ऊस बिलावर पडण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.  राज्यातील एकूण उत्पन्नाचा विचार केल्यास राज्यात तयार होणाऱ्या साखर उत्पन्नापैकी फक्त ३५ टक्के साखर येथेच विकली जाते. उर्वरित ६५ टक्के साखर ही राज्याबाहेर विकावी लागते. कोलकत्ता, मेघालय, आसाम, पश्‍मिम बंगाल, हिमाचल प्रदेश व आसपासच्या राज्याकडे महाराष्ट्रातील साखर जाते. गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास देशात सर्वत्रच साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. यामुळे खरेदीदारांनी सावधतेने जिथे स्वस्त पडेल तिथे खरेदी केली. याचाच तोटा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना झाला. उत्तर प्रदेशातून या राज्यांकडे साखर पाठविली तर ती महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पडते. महाराष्ट्रातून साखर या राज्यांना पाठवायची म्हटले तर क्विंटलला दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंतचा जादा खर्च खरेदीदारांना येतो. यामुळे खरेदीदारांनी आपसूकच उत्तर प्रदेशाच्या साखरेला पसंती दिली. साखरेचा दर तेवढाच असला तरी वाहतूकखर्चातील बचतीमुळे या राज्यांना ती साखर स्वस्तात मिळू शकते. याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील साखरेच्या मागणीवर झाला. परिणामी साखर विक्री ठप्प झाली. जून नंतर तर अगदी मंदगतीने साखरेची विक्री झाल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांतील साखरेची स्थिती राज्यात गेल्या वर्षी १९५ कारखान्यांनी ९५० लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते. त्या अगोदरच्या म्हणजे २०१७-१८ च्या हंगामात ही कारखान्यांनी १०७ लाख मेट्रिक टनापर्यंतच उत्पादन केले होते. गेल्या ऑक्‍टोंबरमध्ये(२०१८) राज्यात ५३ लाख मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक होता. त्या साठ्याच्या दबावातच गेल्या वर्षीचा हंगाम सुरू झाला. कारखान्यांवरील तो दबाव अद्यापपर्यंत हटला नाही कंपन्यांनी साखरेतील गुंतवणूक टाळली गेल्या दोन वर्षांत साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. शीतपेय व अन्य कंपन्यांनी साखरेचे उत्पादन जास्त असल्याने आवश्‍यक त्या प्रमाणातच खरेदी केली. जादा साखरेचा साठा करून त्यात रक्कम गुंतवणूक करणे टाळले. उत्पादीत होणारी बहुतांशी साखर ही शीतपेय व प्रक्रिया उद्योगाला जाते. परंतु साखर खरेदी विक्रीतील मध्यस्थांकडून अंदाज घेऊन कंपन्यांनी लागेल इतकीच साखर खरेदी केली. केंद्राने किमान साखर विक्री मूल्य वाढविल्याने खरेदीत थोडासा फरक पडला; परंतु कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, अशी परिस्थिती आली नसल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. निम्मी साखर पडून गेल्या हंगामाअखेर तब्बल ५५ लाख टनांहून अधिक साखर शिल्लक राहिल्याने याचा मोठा फटका यंदा साखर कारखान्यांना बसणार आहे. अपवाद वगळता प्रत्येक कारखान्यांची निम्म्याहून अधिक साखर कारखान्यांच्या गोडाऊनमध्ये पडून आहे. या साखरेवर कर्ज काढले असले तरी प्रत्यक्षात त्याची विक्री न झाल्याने आता साखर कधी विकायची, असा प्रश्‍न कारखानदारांपुढे आहे. एकरकमी एफआरपी देण्याबाबत सरकार, शेतकरी संघटनांचा दबाव कारखान्यांना असाह्य होत असल्याची स्थिती कारखाना वर्तुळात आहे.  कारखानदारांचे शासनाकडे बोट केंद्र, राज्य सरकारने साखर उद्योगाकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप कारखाना वर्तुळातून होत आहे. शासनाकडून २०० रुपये वाहतूक अनुदान मिळावे, अशी मागणी कारखान्यांनी केली होती. परंतु त्याकडे फारसे लक्ष न दिल्याने कारखान्यांनी साखर विक्रीसाठी वेगाने पावले उचलता आली नाहीत. याचाच फटका साखर शिल्लक राहण्यावर झाला असल्याचे कारखानदारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com