साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढ

गेल्या वर्षभरापासून क्विंटलला ३१०० रुपयांच्या आसपास असणारे साखरेचे दर गेल्या पंधरा दिवसांत वाढत जाऊन ३३०० रुपये झाले आहेत. नजीकच्या काळात ३५०० रुपये पर्यंत दरात वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.
Sugar price hike by Rs 200
Sugar price hike by Rs 200

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत आहेत. याचा सकारात्मक परिणाम स्थानिक साखर विक्रीच्या दरावर होत आहे. गेल्या वर्षभरापासून क्विंटलला ३१०० रुपयांच्या आसपास असणारे साखरेचे दर गेल्या पंधरा दिवसांत वाढत जाऊन ३३०० रुपये झाले आहेत. नजीकच्या काळात ३५०० रुपये पर्यंत दरात वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.

यंदाच्या साखर हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर साखर उद्योगाकडून साखरेच्या किमान विक्री दरात शासनाने वाढ करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. परंतु सरकारने निर्णय घेण्याआधीच बाजारातील साखरेचे दर वाढत असल्याने साखर कारखान्यांना अनपेक्षित सुखद धक्का बसला आहे. साखरेचे दर वाढत असल्याने अनेक कारखान्यांनी जुनी साखर ही बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. शिल्लक साखरेचा साठा कमी होत असल्याने याचा सकारात्मक परिणाम यंदा सुरू होणाऱ्या साखर हंगामावर होणार आहे.

साखरेच्या दरात आणखी शंभर दोनशे रुपये वाढ झाल्यास व साखरेची विक्री वेगात झाल्यास यंदाच्या हंगामासाठी साखर कारखान्यांना बँकेवर कमी अवलंबून राहावे लागेल. हे कारखान्यांना फायदेशीर ठरेल, अशी शक्यता साखर कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली. 

भारताला निर्यातीला वाव आंतरराष्ट्रीय बाजार आणि व्यापार स्रोतांकडून आलेल्या अहवालांनुसार, ब्राझीलमध्ये सध्या सुरू साखर हंगामात साखर उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. दुष्काळामुळे साखर उत्पादन कमी होत आहे. याचा परिणाम दर वाढण्यावर होत आहे. ब्राझीलमध्ये पुढील साखर हंगाम एप्रिल २०२२ मध्ये सुरू होईल. या हंगामात ही साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. बाजारातील सूत्रांनुसार थायलंडमध्ये साखरेचे उत्पादन यंदा जास्त राहण्याची शक्यता आहे. पण ही साखर जानेवारी २०२२ नंतर येईल. तोपर्यंत भारताला साखरनिर्यातीला वाव आहे.

 केंद्राचा यंदाच्या हंगामाबाबतचा अंदाज केंद्राच्या अंदाजानुसार मागील हंगामातील शिल्लक साखर ९० लाख टन इतकी आहे. यंदा  ३४० लाख टन साखर (इथेनॉलनिर्मितीची साखर वगळून) तयार होईल. मागील वर्षासह यंदा उपलब्ध साखर ४३० लाख टन असेल. स्थानिक बाजारात २६५ लाख टन साखर विक्री होऊ शकते. निर्यात अथवा इथेनॉलनिर्मिती झाली नाही, तर १६५ लाख टन साखर पुढील हंगामासाठी शिल्लक राहू शकते. शिल्लक साखर कमी राहावे यासाठी निर्यात व इथेनॉलनिर्मिती दोन्ही महत्त्वाच्या बाबी असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणारे साखरेचे दर स्थानिक बाजारातील साखरेच्या दराची तेजी वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही महिने साखरेचे दर चांगले राहण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी निर्यात करताना या बाबी लक्षात घेऊन जादा साखर निर्यात केल्यास ते उद्योगासाठी फायदेशीर ठरू शकेल.  - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com