साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा पल्ला ओलांडला

साखर दराने आता ३५०० रुपयांचा टप्पा पार केला असून, अनेक कारखान्यांची साखर ३६०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. येत्या दोन महिन्यांत सणासुदीचे दिवस असल्याने साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा पल्ला ओलांडला
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा पल्ला ओलांडला

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक बाजारात साखरेचे वाढलेले दर चढेच राहत आहेत. साखर दराने आता ३५०० रुपयांचा टप्पा पार केला असून, अनेक कारखान्यांची साखर ३६०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. येत्या दोन महिन्यांत सणासुदीचे दिवस असल्याने साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भविष्यात साखरेची चणचण लक्षात घेता वायदे बाजार (फ्यूचर मार्केट) ही तेजीत असल्याने याचा परिणाम सहाजिकच स्थानिक बाजारात झाला आहे. येत्या काही महिन्यांत साखर वाढीव दराने मिळेल या अपेक्षेने व्यापारी सध्या वेगाने साखर खरेदी करत आहेत. याचा सकारात्मक परिणाम दर वाढण्यावर झाला आहे.  पंधरवड्यात ५०० रुपयांनी वाढ अनेक जागतिक संस्थांनी ब्राझीलसह अन्य देशात साखरेचे उत्पादन भविष्यात कमी होण्याचा अंदाज वर्तवल्या नंतर जागतिक बाजारात अनपेक्षित तेजी आली, याचा फायदा स्थानिक बाजारालाही होऊन दरात वाढ सुरू झाली. किमान विक्री मूल्य ३१०० रुपये दराच्या वर पहिल्यांदाच साखरेला मागणी आली. एक-दोन दिवसांत दर वाढत वाढत जाऊन आता काही साखर कारखान्यांनी ३६०० रुपयांपर्यंत साखर विकली आहे. पंधरवड्यात तब्बल पाचशे रुपयांनी दर वाढल्याने याचा मोठा फायदा कारखान्यांना येणाऱ्या हंगामातील एफआरपीची रक्कम देताना होणार आहे. ‘आयएसओ’कडून ही साखर घटीचा अंदाज इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनच्या (आयएसओ) ताज्या अंदाजानुसार यंदा ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ३५ ते ४० लाख टन कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या हंगामात जागतिक बाजारात ३० ते ३५ लाख टन साखरेचा  तुटवडा निर्माण होऊ शकतो. गेल्या आठ दिवसांमध्ये जागतिक बाजारातील क्रूड ऑइलचे दर वाढलेले आहेत. या बरोबरच इथेनॉलला मिळणारे चांगले दर यामुळे उर्वरित हंगामात ब्राझील मध्ये इथेनॉल जादा उत्पादन होण्याची शक्यता असल्यामुळे साखरेच्या उत्पादनात आणखी घट होईल असा अंदाज आहे. निर्यातीला प्राधान्य द्या अफगाणिस्तान मधील परिस्थितीमुळे अफगाणिस्तानला साखर निर्यात होण्याची शक्यता कमी असली, तर अन्य देशाकडून भारतीय साखरेला मागणी येण्याची दाट शक्यता आहे. जवळील देशाकडून यंदा भारतीय साखरेला मागणी राहील, असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. यामुळे साखर कारखानदारांनी स्थानिक विक्रीबरोबरच साखरेची मागणी नोंदवणाऱ्या देशांकडे प्राधान्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त साखर देशाबाहेर पाठवावी, असे आवाहन साखर उद्योगातील तज्ज्ञांनी केले आहे.

प्रतिक्रिया.. साखरविषयक उद्योगातील नामवंत संस्थांनी केलेल्या जागतिक सर्वेक्षणांमधून येत्या हंगामात साखरेची चणचण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कच्च्या साखरेचा जागतिक साखर बाजार २० ते २१ सेंट्स प्रति पाउंड (३१६८ ते ३३४० रुपये प्रति क्विंटल एक्स मिल) राहण्याचा अंदाज आहे. यामुळे साखरनिर्मिती ही फायदेशीर ठरू शकते. जागतिक परिस्थितीची माहिती घेऊन साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे धोरण ठरवावे. - प्रकाश नाईकनवरे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली

कारखानदारांनी बाजारात झालेली साखरेची वाढ टिकवून ठेवायची असेल, तर थोड्या थोड्या प्रमाणात कच्च्या साखरेच्या निर्यातीचे करार करणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांमध्ये निर्यात करार पाहिले असता ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान झालेल्या करारापेक्षा फेब्रुवारीनंतर झालेल्या निर्यातीच्या करारांना ज्यादा दर मिळाले होते. भारतीय कारखानदारांनी साखरेची जादा निर्यात केली, तर भविष्यात स्थानिक बाजारातील साखरेच्या किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com