देशात २३ लाख टनांनी साखर उत्पादन वाढ

देशात मार्चच्या मध्या अखेर २८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीपेक्षा २३ लाख टनांनी यंदा अतिरिक्त साखरनिर्मिती झाली आहे. मार्च २०२१ मध्ये याच कालावधीत २५९ लाख टन साखरनिर्मिती झाली होती.
Sugar production in the country increased by 23 lakh tonnes
Sugar production in the country increased by 23 lakh tonnes

कोल्हापूर : देशात मार्चच्या मध्या अखेर २८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीपेक्षा २३  लाख टनांनी यंदा अतिरिक्त साखरनिर्मिती झाली आहे. मार्च २०२१ मध्ये याच कालावधीत २५९ लाख टन साखरनिर्मिती झाली होती.

देशातील ८१ कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. ४३५ साखर कारखाने अजूनही सुरू आहेत. यंदा कर्नाटकात हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील ७२ पैकी २४ साखर कारखान्यांनी हंगाम संपवला आहे. या खालोखाल उत्तर प्रदेश मध्ये १६ कारखान्यांनी; तर महाराष्ट्रामध्ये १३ कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. महाराष्ट्रातील  कोल्हापूर विभागात बहुतांशी साखर कारखाने बंद झाले आहेत. 

यंदा देशात महाराष्ट्राने साखर उत्पादनात पहिल्या महिन्यापासूनच आघाडी घेतली. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच १०० लाख टनांवर साखर उत्पादित झाली. देशात २८३ लाख टन साखर तयार झाली; यापैकी एकट्या महाराष्ट्रातच १५ मार्च अखेर १०८ लाख टन साखर तयार झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी या कालावधीत ९४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, या तुलनेत सुमारे चौदा लाख टनांनी साखर उत्पादन अधिक झाले आहे. 

सध्या महाराष्ट्रात १८४ साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. राज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत हंगाम जलद गतीने संपण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम येत्या आठ दिवसांत संपुष्टात येईल, अशी शक्यता साखर उद्योगातील सूत्रांची आहे. बंद झालेल्या साखर कारखान्यांत सोलापूरचे दोन वगळता उर्वरित सर्व कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आहेत.

कर्नाटकात कारखाने जलद गतीने बंद... कर्नाटकात आत्तापर्यंत ७२ कारखान्यांनी ५४ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. सध्या २४ साखर कारखाने बंद झाले आहेत. कर्नाटकाची गेल्या वर्षीपेक्षा १३ लाख टनांनी साखरेचे उत्पादन वाढले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या कालावधीत कर्नाटकातील हंगाम जवळ जवळ पूर्णपणे संपला होता. या कालावधीत गेल्या वर्षी ६६ पैकी ६२ कारखाने बंद झाले होते, यंदा मात्र जादा ऊस असल्याने २४ साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा जास्तच साखर उत्पादन असले, तरी प्रमुख साखर उत्पादक राज्यांच्या तुलनेत यंदाही देशात कर्नाटकातच हंगाम सर्वांत अगोदरच संपेल अशी शक्यता आहे. मार्च अखेरपर्यंत कर्नाटकातील ८० टक्के हंगाम संपण्याची शक्यता आहे.

 ‘यूपी’ची पिछाडी कायम यंदा उत्तर प्रदेशात सुरुवातीपासूनच साखर उत्पादनाची ‘धीमी’गती आहे. एकशेवीस साखर कारखान्यांनी ७८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले. गेल्या वर्षी याच कालावधीत ८४ लाख टन साखरेचे उत्पादन उत्तर प्रदेशात झाले होते. देशातील अन्य भागांत साखरेचे उत्पादन वाढले असताना उत्तर प्रदेशात मात्र गेल्या वर्षीपेक्षा साखर कमी तयार होत आहे. सध्या उत्तर प्रदेशातील १६ साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. बहुतांशी कारखाने पूर्व व उत्तर प्रदेशातील आहेत. यंदा साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची पिछाडी शेवटपर्यंत कायम राहण्याची शक्यता साखर उद्योगाची सूत्रांची आहे. उर्वरित आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांनी १५ मार्चपर्यंत एकत्रितपणे २६.४३ लाख टन साखरेचे उत्पादन केले. गुजरात मध्ये ९ लाख, तर तमिळनाडूमध्ये ५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. आंध्र प्रदेशातील २, तेलंगणातील ३, बिहारमधील ९, पंजाबमधील ६, मध्य प्रदेशातील ५, छत्तीसगडमधील १, राजस्थानमधील १ आणि ओडिशातील १ अशा करखान्यांनी हंगाम संपवला आहे. 

यंदाही विक्रमी निर्यात शक्य क्रूड तेलाचे दर वाढल्याने गेल्या पंधरा दिवसांत साखरेचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले. यामुळे साखर निर्यातीचे कराराने गती घेतली. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे ६४-६५ लाख टन साखरनिर्यातीचे करार झाले आहेत. फेब्रुवारी, २०२२ अखेरपर्यंत भारतातून सुमारे ४७ लाख टन साखर भौतिकरीत्या निर्यात झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत सुमारे १७.७५ लाख टन निर्यात झाली होती. निर्यात प्रक्रियेत असलेल्या साखरेचा विचार करता या महिन्याच्या अखेरीस भौतिक निर्यात सुमारे ५५ - ५६ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या हंगामात भारतीय साखर उद्योग ७५ लाख टन निर्यात करू शकेल, असा अंदाज आहे. ही निर्यात विक्रमी ठरू शकते. याचा सकारात्मक परिणाम पुढील हंगामाच्या प्रारंभी होऊ शकतो. ज्यादा प्रमाणात साखर निर्यात झाल्यास डोईजड ठरणारा शिल्लक साठा कमी होईल, अशी आशा साखर उद्योगाची आहे.

इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण ९.४५ टक्क्यांपर्यंत ‘इस्मा’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  ४१६.३३ कोटी लीटरच्या गरजेच्या तुलनेत, १३ मार्च  पर्यंत ११३.१७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या एकूण पुरवठ्यापैकी सुमारे ८६% उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलचा समावेश आहे. डिसेंबर २०२१ पासून मार्चच्या मध्यापर्यंत देशाने सरासरी ९.४५ टक्क्यांची मिश्रित टक्केवारी गाठली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com