देशात साखर उत्पादनात २६ टक्के घट

sugar
sugar

नवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू होते. या कारखान्यांनी १ ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान १०८.८ लाख टन साखर निर्मिती केली आहे. गेल्या वर्षी याच काळातील उत्पादनाच्या तुलनेत २६.२ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून मिळाली.   देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांकडून गाळप केले गेले. तर मागील वर्षी याच काळात ५११ साखर कारखाने सुरू होते. साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या उत्तर प्रदेशात यंदा ११९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. मागील वर्षी याच काळात ११७ साखर कारखाने सुरू होते. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत ४३.८ लाख टन साखर निर्मिती केली होती. तर मागील वर्षी याच काळात ४१.९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन वाढले आहे.  कर्नाटकातील ६३ साखर कारखान्यांनी २१.९ लाख टन साखर उत्पादन घेतले. गेल्या वर्षी याच काळात ६५ साखर कारखान्यांनी २६.८ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. कर्नाटक साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर तीन नंबरवर आहे. देशातील साखर कारन्यांकडे २०१८-१९ मधील हंगामातील साडेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.  महाराष्ट्रात साखर उत्पादनात ५५ टक्के घट देशातील साखर उत्पादनातील नंबर दोनवर असलेल्या महाराष्ट्रात यंदा उसाची उपलब्धता कमी असल्याने साखर उत्पादन घटले आहे. यंदा राज्यातील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ५५.४ टक्क्यांनी घटले आहे. एक ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान राज्यात २५.५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यात या काळात १३९ साखर कारखान्यांनी गाळप केले. मागली वर्षी याच काळात १८९ साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते. नगर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एक साखर कारखाना ऊस उपलब्धतेअभावी बंद पडले आहेत, अशी माहिती ‘इस्मा’ने दिली.  १५६ कोटी इथेनॉल पुरवठा होणार ‘इस्मा’ने म्हटले आहे, की देशातील साखर कारखान्यांनी तेल कंपन्यांशी पहिले करार केल्याप्रमाणे १५६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. करार झालेल्या १५६ कोटी लिटर इथेनॉलपैकी सहा हजार १६३ लाख लिटर इथेनॉल हे बी-हेव्ही मोलॅसिसपासून बनविले जाणार आहे. तर, १०६० लाख लिटर इथेनॉल थेट उसाच्या रसापासून बनविले जाणार आहे.  राज्यनिहाय साखर उत्पादन (लाख क्विंटलमध्ये)

राज्य  २०१९-२०   २०१८-१९  बदल (टक्के) 
उत्तर प्रदेश ४३.७८  ४१.९३ ४.४ 
महाराष्‍ट्र    २५.५१   ५७.२५  (-)५५.४ 
कर्नाटक  २१.९०  २६.७६    (-)१८.२ 
गुजरात  ३.७२  ५.४२ (-)३१.४ 
तमिळनाडू   १.५०  २.२९    (-)३४.५ 
आंध्र प्रदेश  १.८५  २.८५  (-)३५.१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com