अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट 

राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या गाळपात १०० लाख टन नवी साखर तयार होण्याची शक्यता आहे.
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट 

पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या गाळपात १०० लाख टन नवी साखर तयार होण्याची शक्यता आहे. अभूतपूर्व साखर साठ्याची समस्या सोडविण्यासाठी यंदा उत्पादन किमान २० लाख टनाने घटविण्याची व्यूहरचना साखर संघाने केली आहे.

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. चांगल्या मॉन्सूनमुळे यंदा ऊस उत्पादनात आधीच्या अंदाजापेक्षा ८० ते ९० लाख टनाने वाढ होणार आहे. आधीचा अंदाज ८१५ लाख टनाचा होता. तो आता ८९० लाख टनाच्या पुढे जाईल. उसाची उत्पादकता देखील हेक्टरी ७५-८० टनावरून ९० टनाच्या राहू शकते. 

साखर उद्योगात सध्या सातत्याने आढावा बैठका सुरू आहेत. कारण, ऊस उपलब्धता आणि साखर साठाही जादा असल्याने गाळपाचे नियोजन पारंपरिक पद्धतीने झाल्यास मोठे आर्थिक संकट उभे राहील, अशी भीती साखर कारखान्यांना वाटते. कारण, आधीच्या ७२ लाख टनाच्या शिल्लक साठ्यात नव्या हंगामातील १०१ लाख टन साखरेची भर पडू शकते. म्हणजेच पुढील एक वर्ष विकली जाईल इतकी साखर शिल्लक आहे. त्यात पुन्हा दुपटीने भर पडणार आहे. यातून सर्व आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते, असे साखर संघातील जाणकारांना वाटते. 

गेल्या (२०१९-२०) हंगामात गाळपाला फक्त ५४५ लाख टन ऊस होता. त्यातून ६१ लाख टन साखर तयार झाली. साखर कारखाने देखील १४७ सुरू होते. येत्या २०२०-२१ हंगामाची स्थिती मात्र बहुतांश २०१८-१९ च्या हंगामासारखी आहे. २०१८ मध्ये राज्यात ९५२ लाख टन ऊस होता. यातून १०२ सहकारी आणि ९३ खासगी कारखान्यांनी १०७ लाख टन साखर तयार झाली होती.  ‘‘चांगल्या पावसामुळे यंदा गाळप ९०० लाख टनाच्या पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे.  त्यामुळे किमान १९५ कारखाने सुरू करावेच लागतील. कारखान्यांना तातडीने पूर्वहंगामी  कर्ज द्यावे लागेल. यंदा सरकारी यंत्रणेला गाफील राहून चालणार नाही. साखर संघाचे प्रयत्न आहेत. पण, बॅंका, साखर आयुक्तालय, अर्थ खाते, सहकार विभागाला झटून काम करावे लागेल,’’ असे मत साखर उद्योगातून व्यक्त करण्यात आले.  प्रतिक्रिया भरमसाठ साखर निर्मितीमुळे राज्यातील साखर कारखान्यांसमोर यंदा आर्थिक संकट तयार होऊ शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारखान्यांना यंदा साखर उत्पादन घटविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम करावे लागेल. त्यासाठी इथेनॉल निर्मिती जास्तीत जास्त करण्याचा सल्ला साखर संघाने कारखान्यांना दिला आहे. –  संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ

अशी आहे साखर उद्योगाची यंदाची व्यूहरचना

  • साखर उत्पादन ८० लाख टनापुढे न नेणे
  • २० लाख टन साखर क्षमता इथेनॉलमध्ये रूपांतरित करणे 
  • सी हेव्ही मोलॅसिस उत्पादन कसेही करून टाळावे
  • बी हेव्ही मोलॅसिस उत्पादनावर जास्तीत जास्त भर 
  • ज्यूस, सीरप प्रकल्पांनी इथेनॉलकडे वळावे
  • यंदाचा हंगाम मोहीम अर्थात मिशन मोडवर नेणे
  • इथेनॉल निर्मितीसाठी अर्थसहाय्याचे प्रस्ताव देणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com