नांदेड : ऊस लागवड क्षेत्रात वाढ शक्य

ऊस लागवड क्षेत्रात वाढ शक्य
ऊस लागवड क्षेत्रात वाढ शक्य

नांदेड ः यंदाच्या पावसाळ्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे मोठे, मध्यम, लहान सिंचन प्रकल्पासह विहिरी, बोअर आदी सिंचन स्रोतांना पाणी उपलब्ध झाले आहे. परिणामी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत ऊस लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता. परंतु, गतवर्षीच्या दुष्काळामुळे या तीन जिल्ह्यांतील उसाच्या क्षेत्रात २८ हजार ३३२ हेक्टरने घट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात साखर कारख्यान्यांना ऊस कमी पडणार आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या अखेरीस सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पैठण येथील जायकवाडी, येलदरी, सिध्देश्वर, माजलगाव, इसापूर येथील धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. तसेच या तीन जिल्ह्यांतील मध्यम, लघु प्रकल्पामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उपयुक्त पाणीसाठा आहे. विहिरी, बोअरांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांत ऊस लागवड क्षेत्रात वाढ होणार आहेत. सध्या या तीन जिल्ह्यांत ऊस लागवड सुरू आहे.  मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरील इसापूर येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या धरणाच्या लाभक्षेत्रातील हदगाव, अर्धापूर, मुदखेड, नांदेड तसेच भोकर, सिध्देश्वर धरणाच्या लाभक्षेत्रातील अर्धापूर, नांदेड, विष्णुपुरी प्रकल्पांच्या लाभक्षेत्रासह उर्ध्व मानार, निम्न मानार आदी प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात ऊस लागवडीत वाढ अपेक्षित आहे. परभणी जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र आहे त्यामुळे पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, गंगाखेड आदी तालुक्यांत ऊस लागवड वाढेल. येलदरी-सिध्देश्वर धरणाच्या पूर्णा तालुक्यातील लाभक्षेत्रात देखील ऊस लागवड सुरू आहे. माजलगाव धरणाच्या पाण्यावर गंगाखेड तालुक्यात ऊस लागवड होईल. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा सिध्देश्वर तसेच इसापूर दोन्ही धरणांच्या कालव्याची आवर्तने मिळणार असल्याने औंढानागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यांत ऊस लागवडीत वाढ होईल. गतवर्षी (२०१८) या तीन जिल्ह्यांतील ८० हजार २०३ हेक्टरवरील ऊस कारखान्याना गाळपासाठी उपलब्ध झाला होता. गतवर्षी दुष्काळामुळे सिंचनासाठी पाणी कमी पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ऊस मोडून टाकावा लागला होता, त्यामुळे यंदा  (२०१९) या तीन जिल्ह्यांतील ५१ हजार ८८० हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे यामध्ये परभणी जिल्ह्यतील १५ हजार ७५९ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यतील ६ हजार १२१ हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील ३० हजार हेक्टरवरील उसाचा समावेश आहे. उसाखालील क्षेत्रात घट झाल्यामुळे यंदा गाळपासाठी ऊस कमी पडणार आहे.अनेक कारखाने बंद आहेत. परंतु, यंदा ऊस लागवड वाढणार असल्याने पुढील वर्षी (२०१९-२०) च्या गाळप हंगामात कारखान्यांना उसाची उपलब्धता होईल.

मोठ्या, मध्यम प्रकल्पाच्या धरणांत पुरेशा प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात गतवर्षी जास्तपेक्षा ऊस लागवड होईल. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

यंदा जायकवाडी धरणाच्या कालव्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सोयाबीन नंतर ऊस लागवड करत आहोत. उसामध्ये  हरभऱ्याचे आंतरपीक घेणार आहोत. - माधवराव जोगदंड,  देवठाणा, ता. पूर्णा, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com