पुणे विभागात पावणेदोन लाख हेक्टरवरील ऊस अडचणीत

आमची वीस एकर शेती आहे. यंदा साखर कारखान्याला गाळपासाठी दहा एकर ऊस असून दोन ते तीन खोडवा ठेवण्याचे नियोजन आहे. आगामी काळात पाणीटंचाई भासण्याची शक्यता लक्षात घेऊन चालू वर्षी फक्त एक एकरावर लागवड केली आहे. दोन महिन्यांपूर्वी कालव्याला पाणी येऊन गेल्यामुळे सध्या पाण्याची स्थिती बरी आहे. परंतु, आगामी काळात चांगलीच पाणीटंचाई जाणवणार आहे. - बाळकृष्ण ज्ञानदेव पाचपुते, शेतकरी, बोरीबेल, ता. दौंड. जि. पुणे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः यंदा कमी झालेला पाऊस आणि आॅक्टोबरपासून जाणवू लागलेली पाणीटंचाई याची चांगलीच झळ ऊस लागवडीला बसली आहे. पुणे विभागात अनेक ठिकाणी ऊस लागवडी खोळंबल्या आहेत. त्यातच पाण्याची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. मात्र, पाणीटंचाईमुळे उसाचे एक लाख ७० हजार ६८० हेक्टर क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखर कारखान्यांपुढे उसाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. 

पुणे विभागात आडसाली, सुरू, पूर्वहंगामी, खोडवा उसाचे सरासरी चार लाख १३ हजार ५८० हेक्टर क्षेत्र आहे. यंदा खोडवा पीक वगळता उसाची नव्याने एक लाख ४१ हजार २० हेक्टरवर लागवड झाली आहे. तर शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी लागवड केलेल्या व यंदा गाळप झालेला सुमारे २९ हजार ६६० हेक्टरवरील ऊस खोडवा म्हणून ठेवला आहे. सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास विभागात ऊस लागवड क्षेत्रात दोन लाख ४२ हजार ९०० हेक्टर क्षेत्राने घट झाली आहे. त्यातच गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे विभागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. येत्या काळात टंचाई स्थिती आणखी तीव्र होईल. सध्या विभागात अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शेतीसाठीच्या पाण्याची स्थितीही भीषण झाली आहे. विभागात अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या असून, बोअरवेलचे पाणी झपाट्याने कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे ऊस शेतीसह इतर पिकेही धोक्यात आली आहेत. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, नगर जिल्ह्यातील राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, सोलापूर जिल्हातील पंढरपूर, करमाळा, मोहोळ, माढा, दक्षिण सोलापूर हे तालुके उसाचे आगार म्हणून ओळखली जातात. या तालुक्यात दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू उसाच्या लागवडी करून उत्पादन घेतात. तर काही शेतकरी खोडवा पिकांचेही उत्पादन घेतात. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात दरवर्षी चांगली वाढ होते. यंदा कमी पावसाचा आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे दीड लाख हेक्टरच्या पुढे ऊस लागवड क्षेत्र गेलेले नाहीत.  माझ्याकडे वडिलोपार्जित एकूण तीस एकर शेती आहे. दरवर्षी सर्व क्षेत्रावर ऊस लागवड करतो. सध्या पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. पाण्याची आगामी स्थिती पाहता गेल्या वर्षी ऊस लागवड करण्याचे टाळले आहे, असे जवळे (ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील शेतकरी  अनिकेत खालकर यांनी सांगितले.

जिल्हानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र  ऊस लागवडीचे क्षेत्र
नगर  १,२१,१८०   ६७,६२०
पुणे   १,३०,६३० ४५,०४० 
सोलापूर  १,६१,७७० ५८,०२० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com