‘व्हीएसआय’मार्फत नुकसानग्रस्त ऊस पिकाची पाहणी सुरू

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील मुख्य पीक असलेल्या ऊस पिकाची पाहणी ‘व्हीएसआय’मार्फत सुरू केली आहे. जो ऊस वाचवता येईल त्याकरिता काय उपाययोजना करायच्या यासाठी प्रामुख्याने पाहणी करून मार्गदर्शन केले जाईल. पाहणीनंतर एकत्रित अहवाल आल्यावर त्याच्या उपाययोजना सुरू करण्यात येतील. - विकास देशमुख, संचालक, व्हीएसआय, पुणे.
ऊस पिकाची पाहणी करताना तज्ज्ञ
ऊस पिकाची पाहणी करताना तज्ज्ञ

कऱ्हाड, जि. सातारा  ः सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे ऊस पीक पूरस्थितीमुळे आठ ते दहा दिवस पाण्यात राहिले. त्यामुळे तो ऊस जगेल की नाही याची खात्री नाही. त्यातील किती टक्के ऊस वाचवता येऊ शकेल याचा अंदाज घेऊन त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याच्या पाहणीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांचे पथक पाठवण्यात येईल, अशी घोषणा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केली होती. यानंतर लगेचच ‘व्हीएसआय’चे संचालक विकास देशमुख व त्यांच्या पथकाने पूरग्रस्त गावांतील नुकसानग्रस्त ऊस पिकाची थेट शिवारात जाऊन पाहणी सुरू केली आहे. 

महापुराने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मोठे थैमान घातले. त्यामुळे नदी, ओढ्याकाठची शेती पूर्णतः पाण्यात गेली. अनेक दिवस पिके पाण्यात राहिल्याने त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पूरग्रस्त तांबवे गावास भेट दिली. त्या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रमुख पीक ऊस आहे. त्या पिकाच्या वर चार-पाच फूट पाणी असल्याने ते पीक आता जगेल याची खात्री राहिलेली नाही.

मात्र त्यातील किती ऊस वाचवता येईल याची पाहणी करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांचे पथक पाठवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार ‘व्हीएसआय’चे संचालक विकास देशमुख, शास्त्रज्ञ श्री. घोडके, श्री. भोईटे यांच्या पथकाने पूरग्रस्त गावांतील नुकसानग्रस्त उसाची पाहणी सुरू केली आहे. त्यांना सांगली, सातारा जिल्ह्यांतील नदीकाठच्या पूरबाधित ऊस पिकांची पाहणी केली. या वेळी सह्याद्री कारखान्याचे शेती अधिकारी मोहनराव पाटील, एम. ए. बाबर, प्रताप पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com