नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
अॅग्रो विशेष
ऊसगाळप १ ऑक्टोबरपासून : सहकारमंत्री देशमुख
राज्यात २२ हजार कोटी रुपयांच्या आसपास शेतकऱ्यांना एफआरपी देणे अपेक्षित होते. मात्र अजून साडेपाचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात माझ्या कारखान्याचेदेखील १६ कोटी थकीत आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ एफआरपी देण्याबाबत माझ्या कारखान्यांसह इतर कारखान्यांना मी स्वतः सूचना दिलेल्या आहेत.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री.
पुणे : राज्याचा ऊसगाळप हंगाम यंदा १ ऑक्टोबरपासून सुरू केला जाईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
साखर आयुक्तालयात राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की यंदा गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी शासनाकडून नियोजन सुरू आहे. राज्यातील सर्व उसाचे गाळप वेळेत करण्याचा प्रयत्न राहील. औरंगाबाद विभागात कारखाने कमी आणि यंदा ऊस जादा आहे. त्यामुळे या विभागाच्या नियोजनासाठी स्वतंत्र आढावा बैठक घेतली जाईल. राज्यातील कोणते कारखाने सुरू होतील. कोणते आजारी कारखाने सुरू करता येतील, याबाबत आढावा घेतला जात आहे. आजारी कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यामुळे यंदा एकूण १९५ च्याआसपास कारखाने चालू होतील, असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
गाळप सुरू झाल्यानंतर कारखान्यांनी पहिले काही दिवस कच्ची साखर तयार करावी. त्यामुळे निर्यात वाढविता येईल, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, या साखरेचेदेखील निर्यातभाव निश्चित करण्याची मागणी कारखानदारांची आहे. तसा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारला पाठविणार आहोत, असे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. मावळत्या हंगामात साखरेचे दर घसरल्यामुळे काही कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले आहेत. ताळेबंद उणे असल्यामुळे या कारखान्यांना नवे कर्ज मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.
याबाबत श्री. देशमुख म्हणाले,की नाबार्ड, शिखर बॅंक, कारखाने प्रतिनिधींची एक समिती तयार करून शासनासमोर उपाय मांडले जातील. कारण, गाळप पूर्ण क्षमतेने व्हावे, शेतकऱ्यांना पैसा मिळावा आणि बॅंकांचे कर्जदेखील वसूल व्हावे, अशी भूमिका ठेवूनच नियोजन केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील गुरुवारी (ता.९) साखर कारखान्यांच्या ठिबक ऊस लागवड योजनेचा आढावा घेणार आहेत. त्याचवेळी कारखान्यांच्या वित्तीय बाबींविषयक प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तालयाकडून योग्य कामकाज होते आहे. काही कारखान्यांना देण्यात आलेल्या आरआरसी कारवाईला स्थगिती आमच्या पातळीवर देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी या कारखान्यांना वेळ मिळावा हाच हेतू या स्थगितीमागे आहे, असे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले.
---------------
असा असेल यंदाचा गाळप हंगाम
- गाळप हंगामाची सुरवात - १ ऑक्टोबरपासून
- उसाची झालेली यंदाची लागवड- ११.६२ लाख हेक्टर
- उसाची होणारी उपलब्धता- ९४७ लाख टन
- प्रतिहेक्टरी अंदाजे उत्पादकता - ९० टन
- यंदाचे साखर उत्पादन - १०७ ते ११० लाख टन
- काटामारी तपासणीसाठी यंदाही भरारी पथके
- गाळप परवाने ऑनलाइन दिले जाणार
- सहकार महामंडळासाठी प्रतिटन एक रुपया वर्गणी कपात
- 1 of 656
- ››