Sugarcane cultivation speed in Satara district
Sugarcane cultivation speed in Satara district

सातारा जिल्ह्यात ऊस लागवडीस वेग

सातारा : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर अतिपावसामुळे आडसाली ऊस पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. सध्या पूर्व हंगामी ऊस लागवड सुरू असून शेतकरी लागवडीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. या हंगामात उसाचे क्षेत्र घटल्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस कमी पडणार आहे. 

ऊस उत्पादनात वाढ व्हावी, लवकर तोड व्हावी आदी कारणांसाठी आडसाली ऊस लागवड केली जाते. मात्र, जिल्ह्यात या हंगामाच्या काळात अतिवृष्टी झाल्याने लागवडीवर परिणाम झाला आहे. लागवड झालेल्या उसाची अवस्था फारशी चांगली नाही. त्यांनतर पूर्व हंगामी ऊस लागवडी वेळी पावसाने थैमान घातल्याने या उसाची अपेक्षित लागवड झालेली नाही. सध्या या हंगामातील लागवड सुरू आहे.  

उसाच्या क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी कारखान्यांकडून प्रयत्न केले जात आहे. कारखान्यांकडून ऊस बियाणे, खते उधारीवर उपलब्ध करून दिले जात आहेत. गतवर्षी आडसाली उसाची २० हजार ३५५ हेक्टर तर पूर्व हंगामीची १९ हजार ४४० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. या तुलनेत ५० टक्केही लागवड यंदा झाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या पूर्व हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात आली असून डिसेंबर महिन्यातही लागवड सुरू राहण्याचा अंदाज आहे. असे असले तरी पुढील गाळप हंगामात उसाची तीव्र टंचाई भासणार आहे.

गतवर्षीच्या हंगामात सुरू उसाची १२ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. या वर्षी हे लागवड क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. एकूणच पुढील गाळप हंगामाची या हंगामातील पूर्व हंगामी सुरू व खोडवा ऊसाच्या क्षेत्रावर भिस्त राहणार आहे. 

आगामी दोन हंगामावर ऊस टंचाईचे संकट 

महापुरामुळे  हजारो हेक्टर क्षेत्रावरील ऊस खराब झाला आहे. आडसाली उसाचे क्षेत्र घटल्यामुळे आगामी गाळपास ऊस कमी पडणार असल्याने व गाळपाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कारखान्यांना उसाची पळवापळवी करावी लागणार आहे. २०१९-२० च्या गाळप हंगामात उसाचे क्षेत्र कमी होण्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील कारखान्यांची संख्या आणि उसाचे क्षेत्र यामध्ये मेळ घालताना कारखान्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने पुढील हंगामात उसाची पळवापळवी होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com