फलटण शुगर्सच्या विरोधात ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरूच

Sugarcane growers' protest against Phaltan sugars continues
Sugarcane growers' protest against Phaltan sugars continues

सातारा : ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय.., शेतकरी संघटनेचा विजय असो.., ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा..,’ अशी घोषणाबाजी करत साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिले मिळण्यासाठी बुधवारी (ता. ४) शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून गुरुवारी आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. 

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले की, न्यू फलटण शुगरला शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाचे बिल दोन वर्षांपासून थकीत आहे. पैसे मागण्यासाठी कारखान्यावर गेलेल्या शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाने केला. या वेळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊस बिले देण्याचे श्री दत्त इंडिया कंपनीने आश्‍वासन दिले होते. तसेच कंपनीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची सूचनाही त्यांनी दिली होती. मात्र, तेथील कर्मचारी व व्यवस्थापनाने कोणतीही मदत केलेली नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. 

शेतकऱ्यांची थकीत रक्कम ४७.८७ कोटी रुपये असताना शेतकऱ्यांना केवळ २५ कोटी रुपये देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. मुळात शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम व्याजासह मिळावी, अशी मागणी आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम मिळालेली नाही. तसेच कारखान्याला यावर्षीचा गाळप परवानाही दिला गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com