ऊस उत्पादकांनो, समजून घ्या ‘एफआरपी‘चे गणित...

राज्यातील साखर उद्योगातील सर्व घटक ‘एफआरपी‘भोवती केंद्रित झाले आहेत. एफआरपी (फेअर ॲण्ड रेम्युनरेटिव्ह प्राइज) म्हणजे शेतकऱ्यांच्या उसाला दिला जाणारा ‘रास्त व किफायतशीर दर’ होय
Sugarcane growers, understand the math of FRP
Sugarcane growers, understand the math of FRP

राज्यातील साखर उद्योगातील सर्व घटक ‘एफआरपी‘भोवती केंद्रित झाले आहेत. एफआरपी (फेअर ॲण्ड रेम्युनरेटिव्ह प्राइज) म्हणजे शेतकऱ्यांच्या उसाला दिला जाणारा ‘रास्त व किफायतशीर दर’ होय. या दराभोवतीच शेतकरी संघटनांची आंदोलने, कारखान्याचे अर्थकारण, केंद्र सरकारचे धोरण केंद्रित झाले आहे. ऊस उत्पादकांना तारणहार ठरलेली ‘एफआरपी‘ म्हणजे नेमके काय आहे, हे उलगडून सांगणारा हा वृत्तांत.... राज्यातील साखर कारखानदारी, साखर आयुक्तालय, साखर संघ, साखर महासंघ, इस्मा-विस्मा अशा संघटनांच्या कामकाजाची दिशा आणि भूमिका एफआरपीवरून निश्चित होते.  राज्यात  २०० साखर कारखाने आणि २० लाख सभासद शेतकरी आहेत. एफआरपीमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना अंदाजे २० ते २५ हजार कोटी रुपये दिले जातात.  ‘एफआरपी‘ कोण निश्चित करते? राज्य शासन, साखर कारखाने किंवा केंद्र शासन ‘एफआरपी‘ निश्चित करीत नाही. केंद्रीय कृषी मूल्य आयोग दरवर्षी सर्व अभ्यास करतो. त्यानुसार एफआरपी किती असावी, याची शिफारस असलेला एक प्रस्ताव केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीकडे पाठवतो. ही समिती या शिफारशीचा पुन्हा अभ्यास करते. त्यात पुन्हा राजकीय अंदाज घेत कृषी मूल्य आयोग शिफारशीवर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेते. शेतकऱ्यांना यंदा  किती एफआरपी मिळेल, हे गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबरपूर्वी केंद्र सरकारकडून जाहीर केले जाते.  एफआरपी ठरविण्यासाठी आयोग काय करतो? शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी प्रति टन किती खर्च येतो, पर्यायी पीक घेतले तर शेतकऱ्याला किती पैसे मिळाले असते, ग्राहकांना कोणत्या भावाने साखर विकली जात आहे, उसापासून साखर तयार करताना लागणारा खर्च, साखर तयार करताना मिळणारा उतारा तसेच ऊस भुसा, प्रेसमड, मोलॅसिस यांचे मूल्य किंवा त्याच्या विक्रीतून येणारे मूल्य अशा घटकांचा अभ्यास कृषिमूल्य आयोग करतो.  एफआरपी देताना चार गोष्टी महत्त्वाच्या  साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी कशी देतात, याविषयीचे २०१९-२० मधील हंगामाचे एक उदाहरण चार गोष्टींसह समजावून सांगितले आहे. या हंगामात १) साखर कारखान्याच्या १० टक्के साखर उताऱ्यासाठी २७५ रुपये प्रतिक्विंटल भाव दिला गेला. २) १० टक्क्यांच्या पुढील प्रत्येक ०.१ टक्का उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल २.७० रुपये जादा दर द्यावा लागतो. ३) मात्र, उतारा कमी देखील येतो. अशा अवेळी दहा टक्क्यांच्या साखर उताऱ्याच्या खाली म्हणजे ९.५ टक्के उताऱ्यापर्यंत प्रत्येक ०.१ टक्के घटीला प्रतिक्विंटल २.७५ रुपये कमी केले जातात. ४) मात्र, उतारा ९.५ टक्के इतका आला किंवा त्यापेक्षाही कमी असल्यास प्रति क्विंटल २६४.२५ रुपये इतका एफआरपी दर निश्चित केला गेला जाईल. 

  • हे लक्षात घ्या, की चालू हंगामातील एफआरपी दर काढण्यासाठी सरासरी उतारा मात्र गेल्या हंगामाचा वापरला जातो. 
  • केंद्र शासन एफआरपी जाहीर करीत असले तरी तेवढी रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा केली जात नाही. कारण, शेतकऱ्याच्या देय एफआरपीमधून कारखाना त्याचा ऊस तोडणी खर्च आणि ऊस वाहतूक खर्च कापून घेतो. त्यानंतर उर्वरित पेमेंट करीत असतो. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याची तोडणी व वाहतूक खर्चाची पध्दत समजावून घ्यायलाच हवी. 
  • ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या खर्चात कारखाने कोणता खर्च टाकतात?

  • शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ऊस तोडण्याचा खर्च, तोडलेला ऊस गाडीत भरण्याचा खर्च, गाडीतून कारखान्यापर्यंत ऊस आणण्याचा खर्च.
  • ऊस तोडणी मजूर, वाहतूक मजूर यांचा खर्च आणि मजुरांची वाहतूक करण्याचा खर्च.
  • मजुरांना पुरवलेल्या सुविधांवरील खर्च तसेच मालवाहतूकदारांवर केलेला सर्व खर्च.
  • ऊस तोडणी व वाहतूक यासाठी काही कमिशन दिले असल्यास त्याचा खर्च. 
  • मागील हंगामाचा उतारा चालू हंगामाच्या ‘एफआरपी‘साठी कसा वापरतात? समजा एखाद्या कारखान्याचा मागील म्हणजेच २०१८-१९ च्या हंगामाचा सरासरी उतारा १२.१७ टक्के असल्यास शेतकऱ्याला २०१९-२० साठी दिलेल्या उसाला निव्वळ एफआरपी अशी मिळेल... 

  • केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे पहिल्या १० टक्के साखर उताऱ्यासाठी प्रति क्विंटल २७५ प्रमाणे एक टनासाठी २,७५० रुपये दिले जातील.
  • केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे १० टक्के साखर उताऱ्यानंतर पुढील २.१७ टक्के उताऱ्याला प्रतिक्विंटल २७५ प्रमाणे एक टनासाठी (२.१७ × २७५ रुपये) ५९६.७५ रुपये दिले जातील.
  • म्हणजेच केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे ढोबळ एफआरपी (१० % साठी) २,७५० रुपये + (२.१७ %साठी) ५९६.७५ रुपये असे मिळून एक टनासाठी ३,३४६.७५ रुपये मिळते.
  • मात्र, २०१८-१९ च्या हंगामाचा सरासरी तोडणी वाहतूक खर्च कारखाना कापून घेतो. तो खर्च समजा प्रतिटन ५७२.८० रुपये गृहीत धरूयात.
  • यामुळे शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात कारखान्याकडून ढोबळ एफआरपी वजा तोडणी खर्च (३,३४६.७५ रुपये वजा ५७२.८० रुपये) या हिशेबाने प्रति टन २,७७३.७५ रुपये निव्वळ एफआरपी जमा केली जाईल. 
  • मागील हंगामाचा साखर उतारा दहा टक्क्यांच्या खाली असेल तर एफआरपी कशी मिळेल? समजा एखाद्या कारखान्याचा मागील म्हणजेच २०१८-१९ च्या हंगामाचा सरासरी उतारा ९.६ टक्के असल्यास शेतकऱ्याला २०१९-२० साठी दिलेल्या उसाला निव्वळ एफआरपी अशी मिळेल... 

  • केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे पहिल्या १० टक्के साखर उताऱ्यासाठी प्रति क्विंटल २७५ प्रमाणे रुपये (प्रति टनाला २,७५० रुपये) मिळतात. पण, येथे घट असल्यास ०.१ टक्के उतारा घटीला प्रतिक्विंटल २.७५ रुपये कापले जातील.
  • म्हणजेच या कारखान्याचा उतारा फक्त ९.६ टक्के असल्याने येथे घट ०.४ टक्का इतकी आहे. म्हणजेच ०.४ × २७५ याप्रमाणे ११० रुपये प्रति टन रक्कम  १० टक्के उताऱ्यातून (२,७५० रुपयांतून) वजा केले जातील. 
  • म्हणजेच ढोबळ एफआरपी काढण्यासाठी २,७५० रुपये वजा ११० रुपये असे सूत्र वापरावे लागेल. त्यानुसार एका टनासाठी २,६४० रुपये ढोबळ एफआरपी येते.
  • मात्र, २०१८-१९ हंगामाचा सरासरी तोडणी वाहतूक खर्च कारखाना कापून घेतो. तो खर्च समजा प्रतिटन  ६१० रुपये गृहीत धरूयात. यामुळे शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात कारखान्याकडून ढोबळ एफआरपी वजा तोडणी खर्च (२,६४० रुपये वजा ६१० रुपये) या हिशेबाने प्रति टन २,०३० रुपये निव्वळ एफआरपी जमा केली जाईल.
  • मागील हंगामाचा साखर उतारा साडेनऊ टक्क्यांच्या खाली असेल, तर एफआरपी कशी मिळेल? समजा एखाद्या कारखान्याचा मागील म्हणजेच २०१८-१९ च्या हंगामाचा सरासरी उतारा ८.५ टक्के असल्यास शेतकऱ्याला २०१९-२० साठी दिलेल्या उसाला निव्वळ एफआरपी अशी मिळेल...

  • केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे पहिल्या १० टक्के साखर उताऱ्यासाठी प्रति क्विंटल २७५ प्रमाणे रुपये (प्रति टनाला २,७५० रुपये) मिळतात. पण, येथे घट असल्यास ०.१ टक्का उतारा घटीला प्रति क्विंटल २.७५ रुपये कापले जातील. मात्र, साखर उतारा ९.५ टक्के असला किंवा त्यापेक्षाही कमी असला तरी शेतकऱ्याला २६४.२५ रुपये प्रति क्विंटल एफआरपी द्यावी लागेल.
  • म्हणजेच या कारखान्याचा उतारा फक्त ८.५ टक्के असल्याने येथे २,६४२.५० रुपये प्रति टन दर ढोबळ एफआरपी द्यावी लागेल.
  • मात्र,  २०१८-१९ हंगामाचा सरासरी तोडणी वाहतूक खर्च कारखाना कापून घेतो. तो खर्च समजा प्रतिटन ६५० रुपये गृहीत धरूयात.यामुळे शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात कारखान्याकडून ढोबळ एफआरपी वजा तोडणी खर्च (२,६४२.५० रुपये वजा ६५० रुपये) या हिशेबाने प्रति टन १,९९२.५० रुपये निव्वळ एफआरपी जमा केली जाईल. 
  • एफआरपीपेक्षा कमी दराने ऊस खरेदी का करता येत नाही ?

  • शेतकऱ्यांना ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील ३(१) तरतुदीनुसार एफआरपी दिली जाते. ती कायदेशीर तरतूद आहे. 
  • या नियमानुसार कोणत्याही कारखान्याला एफआरपीपेक्षा कमी दराने ऊस खरेदी करता येत नाही. तसेच कमी दर देत करार देखील करता येत नाही. 
  • ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील ३(३) तरतुदीनुसार कोणत्याही कारखान्याने शेतकऱ्याचा ऊस खरेदी केल्याच्या दिवसांपासून १४ दिवसांच्या आत एफआरपी द्यावीच लागते. 
  • मात्र शेतकऱ्यांशी जर कारखान्याने लेखी करार केला असल्यास १४ दिवसांची अट लागू होत नसल्याचे कारण दाखवून एफआरपी उशिरा देण्याची संधी कारखाने घेतात. 
  • कारखान्याने करार केलेला नसल्यास आणि १४ दिवसांच्या आत एफआरपी दिली नसल्यास  ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील ३(३) (ए) नुसार कारखान्याला १५ टक्के व्याजासह एफआरपी द्यावी लागते. 
  • शेतकऱ्याला कारखान्याने वेळेत एफआरपी न दिल्यास या कारखान्यावर आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाई करण्याचे अधिकार साखर आयुक्तांना आहे.  त्याचे प्रमाणपत्र आयुक्त जारी करतात. प्रमाणपत्रानुसार, कारवाई मात्र जिल्हाधिकारी करतात. 
  • साखर कारखाने सक्ती करू शकतात का?

  • लेखी करार केल्यास १४ दिवसांत शेतकऱ्याला एफआरपी देण्याच्या बंधनापासून कारखान्याला सूट मिळते. मात्र ‘फक्त करार केला तरच ऊस खरेदी करू,’ अशी सक्ती कारखान्याला करता येणार नाही. 
  • कोणत्याही शेतकऱ्यावर कारखान्याशी करार करण्याचे बंधन नाही. करार करायचा की नाही, याचा अधिकार पूर्णतः शेतकऱ्याला असतो. 
  • एफआरपीबाबत महाराष्ट्राचा कायदा काय म्हणतो?

  • महाराष्ट्रात (कारखान्यांना पुरवण्यात आलेल्या) ऊसदराचे विनियमन अधिनियम २०१३ असा कायदा राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने केला आहे. या कायद्याच्या आठव्या कलमान्वये ऊसदर निश्चित करण्याचे काही निकष ठरविण्यात आलेले आहेत. 
  • या निकषानुसार, शेतकऱ्यांना ऊस दर ठरविताना साखरेपासून तसेच उपपदार्थांपासून कारखान्याला किती उत्पन्न मिळते हे तपासावे लागते. 
  • उपपदार्थ्यांमध्ये भुशाचे मूल्य (बगॅस), मळीचे मूल्य, प्रेसमडचे मूल्य याचा समावेश होतो. तसेच, ऊस तोडणी व वाहतूक खर्च देखील विचारात घेतला जातो. 
  • साखरेचे मूल्य कसे काढतात?  सवलतीच्या दरात सदस्यांना दिलेल्या साखरेवर किती खर्च झाला, केंद्राने व राज्याने साखर निर्यातीसाठी किती अर्थसाह्य दिले, कारखान्याने किती कच्ची साखर, पांढरी साखर किंवा रिफाइन्ड साखर तयार केली, लेव्हीची म्हणजेच नियंत्रित साखर आहे का, निर्यात साखर किती आहे अशा सर्व मुद्यांच्या साखर विक्रीतून मिळालेली किंमत काढून साखरेचे मूल्य काढले जाते. समजा साखर विकली गेली नाही तर त्याचेही मूल्य तपासले जाते.  भुश्‍शाचे (बगॅस) मूल्य कसे काढतात? कारखान्याने त्या आर्थिक वर्षात किती भुस्सा विकला हे तपासले जाते. मूल्य ठरवताना भुश्शाचे सरासरी बाजारभाव तपासले जातात. मात्र कारखान्याने साखर निर्मितीसाठी बॉयलरचे इंधन म्हणून हा भुसा वापरला असल्यास त्याची गणना केली जात नाही. अर्थात, कारखान्याने सहवीज (कोजनरेशन) निर्मितीसाठी भुस्सा वापरला असल्यास सरासरी बाजारभावानुसार गाळप केलेल्या एकूण उसाच्या चार टक्के इतक्या सरासरी दराने भुश्शाच्या प्रमाणाची गणना केली जाते. मळीचे मूल्य कसे काढतात? कारखान्याने वर्षभरात विकलेल्या मळीतून मिळालेली रक्कम म्हणजे मळीचे मूल्य होय. मात्र कारखान्याकडे स्वतःचे आसवानी युनिट असल्यास त्यासाठी वापरलेली मळी, तसेच इतर कामांसाठी वापरलेल्या मळीचे बाजारभावानुसार असलेले मूल्य हे उत्पन्न म्हणून विचारात घेतले जाते. पण समजा मळी विकलीच गेली नाही, तर अशा शिल्लक मळीचे मूल्य सरासरी बाजारभावाच्या आधारे काढतात.   प्रेसमडचे मूल्य कसे काढतात? कारखान्याने वर्षभरात विकलेल्या प्रेसमडमधून मिळालेली रक्कम म्हणजे प्रेसमडचे मूल्य. मात्र, कारखान्याने मिश्र खतासाठी किंवा इतर  इतर कामासाठी प्रेसमड वापरली असेल, तर सरासरी बाजारभावानुसार अशा प्रेसमडचे मूल्य हे उत्पन्न म्हणून विचारात घेतले जाते. पण समजा प्रेसमड विकली गेली नाही, तर अशा शिल्लक प्रेसमडचे मूल्य हे कारखान्याचे उत्पन्न  म्हणून गृहीत धरतात.    ​ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च म्हणजे नेमका कोणता खर्च? शेतातून कारखान्यापर्यंतची ऊस वाहतूक, ऊसतोडणी, तोडलेला ऊस भरणे याचा खर्च. तसेच तोडणी व वाहतूक कामातील मजुरांवरील खर्च, मजूर व वाहतुकदारांना दिलेल्या सोयीसुविधांवरील खर्च, तोडणी व वाहतुकीसाठी दिलेल्या कमिशनची रक्कम ही या खर्चात गृहीत धरतात. हा खर्च कारखाना काढतो. मात्र, असे वेगवेगळे खर्च महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाकडून देखील निश्चित केले जातात. अशा वेळी कारखान्याने काढलेला खर्च गृहीत धरावा की संघाने काढलेला आकडा गृहीत धरावा, असा मुद्दा उद्भवतो. यावर जो आकडा कमी खर्च दाखवतो तोच आकडा खर्चापोटी गृहीत धरावा, असा निकष आहे. ऊस दर नियंत्रण मंडळ उसाचे दर कसे ठरवते? मंडळ मुख्यत्वे ‘आरएसएफ’ (रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला) ठरवते. विकलेल्या साखरेतून मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारे किंवा भुसा,मळी, प्रेसमड या उपपदार्थांच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेसह साखरविक्रीतून ऊस दर काढला जातो. उपपदार्थाची विक्री करताना दर हे जर बाजारभावापेक्षा कमी असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्यास ऊस दर निश्चित करताना बाजारभावानुसार विक्रीचा दर गृहीत धरला जातो.  ऊस दर नियंत्रण मंडळाला काय अधिकार असतात?

  • ऊस दर हा मंडळाच्या ठरावाद्वारे निश्चित केला जातो. मंडळाचे सदस्य सचिव हा दर एका आदेशानुसार जारी करतात. तसेच कोणत्याही गाळप करीत असलेल्या कारखान्याला आर्थिक वर्ष समाप्तीपासून १२० दिवसात मंडळाकडे उत्पादन व विक्रीची सर्व माहिती द्यावी लागते. यात गाळपाची, साखरेची, मळी, भुसा,प्रेसमड विक्रीची तपशीलवार माहिती असते. 
  • मंडळाने मागितलेली माहिती कारखान्याला सनदी लेखापालाकडून प्रमाणित करून घेत सादर करावी लागते. मंडळाला हवी असलेली माहिती व दस्तावेज साखर आयुक्तालयात सादर करण्याचे बंधन कारखान्यांवर आहे. 
  • कारखान्याने मंडळाचा आदेश न जुमानल्यास काय होते?

  • मंडळाच्या सदस्य सचिवाने ऊस दर आदेश जारी करताच ३० दिवसांच्या आत कारखान्याला तो दर शेतकऱ्यांना द्यावा लागतो. मात्र, कारखान्याने तसे न केल्यास प्रतिवर्षी १२ टक्के व्याज संबंधित शेतकऱ्यांना द्यावे, असे कायदा सांगतो. 
  • ऊस दर नियंत्रण मंडळाने ठरवलेल्या दरापेक्षा जादा दर साखर कारखाने देऊ शकतात. परंतु, त्यासाठी साखर आयुक्तांची मान्यता बंधनकारक आहे. तसेच,  उसाचे दर ठरवताना वजन महत्त्वाचे असते. असे वजन केवळ इलेक्ट्रॉनिक काट्यावर केलेले असावे. तसेच शेतकऱ्याला फक्त बॅंक खात्यातच पेमेंट करावे, असे कायदा सांगतो.
  • ‘आरएसएफ’ म्हणजे काय? रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला (आरएसएफ) हा रंगराजन समितीने ठरवलेला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, साखर विक्री मूल्याच्या ७५ टक्के किंवा साखर व उपपदार्थ (मळी, भुसा, प्रेसमड) या दोन्हींच्या विक्रीतून मिळालेल्या ७० टक्के मूल्यापैकी जे जास्त असेल ते मूल्य हे आरएसएफ गणले जाते.  ‘एफआरपी’पेक्षा ‘आरएसएफ’ जास्त असते का? होय,‘एफआरपी‘पेक्षा जास्त रक्कम ‘आरएसएफ’ फॉर्म्यूल्यातून निघत असेल तरच ती द्यावी लागते. म्हणजेच ‘एफआरपी‘पेक्षा कमी रक्कम कारखान्याला देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.  ‘आरएसएफ’ न मिळाल्यास शेतकऱ्याने काय करावे? आर्थिक वर्ष संपताच चार महिन्यानंतर ‘आरएसएफ' निश्चित केली जाते. त्याला मान्यता ऊस दर नियंत्रण मंडळ देते. मंडळाचा निर्णय साखर आयुक्त घोषित करतात. अशी घोषणा करताच ३० दिवसात शेतकऱ्याला ‘आरएसएफ’ न दिल्यास शेतकऱ्याला १२ टक्के व्याज द्यावे लागते. ‘आरएसएफ’ न मिळाल्यास शेतकरी त्यांच्या कार्यक्षेत्रातील साखर सहसंचालकांकडे अर्ज करू शकतात. देशात महाराष्ट्र व कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये केंद्र सरकारची ढोबळ एफआरपी पूर्णतः अदा केली जाते. पण या राज्यांमध्ये ऊस स्वतः शेतकरी तेथील कारखान्यापर्यंत स्वखर्चाने पोहोचवतात. महाराष्ट्रात कारखाने स्वतः तोडणी व वाहतूक करतात. त्यामुळे मागील हंगामातील ऊस तोडणी व वाहतुकीचा सरासरी खर्च कापूस उरलेली रक्कम यंदाची एफआरपी म्हणून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. मात्र शेतकऱ्याला केंद्राच्या नियमानुसार पूर्ण एफआरपी हवी असल्यास असा शेतकरी कारखान्याला आपला पर्याय सांगू शकतो. अशा वेळी कारखाना सांगेल त्यानुसार शेतकऱ्याला त्याचा ऊस स्वतः तोडून कारखाना सांगेल त्या ठिकाणी पोचवावा लागेल.   - शेखर गायकवाड  (साखर आयुक्त) शेतकऱ्याला कायद्यानुसार १४ दिवसांत एफआरपी प्राप्त करण्याचा हक्क आहे. त्यानंतर १५ टक्के व्याज मिळवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी शेतकऱ्याने प्रथम कारखान्याकडे तक्रार अर्ज करायला हवा. मात्र सहकारी किंवा खासगी कारखान्यासोबत स्वेच्छा करार करून एफआरपी कशी स्वीकारायची हे शेतकरी ठरवू शकतात. मात्र, कराराची सक्ती शेतकऱ्यावर करता येत नाही आणि ही रक्कम केंद्राने घोषित केलेल्या एफआरपीपेक्षा कमी देखील ठेवता येत नाही. कारखान्याकडे तक्रार करूनही थकीत व देय रक्कम न मिळाल्यास शेतकरी जवळच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे लेखी, ई-मेलने तक्रार नोंदवू शकतात.  - मंगेश तिटकारे, साखर सहसंचालक (अर्थ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com