कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू नाहीच

sugarcane crushing season
sugarcane crushing season

कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांच्या ऊसतोड बंदच आहेत. एकरकमी एफआरपी तर द्यावीच, पण त्याबरोबर जादाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस तोडी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांनी अद्याप ऊसतोड सुरू केल्या नसल्याचे चित्र आहे. 

ज्या भागात ‘स्वाभिमानी’चे प्राबल्य आहे, त्या भागातील कारखानादारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. चार दिवसांपूर्वी काही कारखान्यांनी ऊसतोडणी सुरू केली. परंतु निर्णय होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाहने अडवून तोडी बंद पाडल्या होत्या. 

नुकसान नको म्हणून कारखान्यांनीच तोडणीची गती एकदम संथ ठेवली आहे. कारखान्यांच्या अगदी जवळच्या क्षेत्रातील ऊसतोडणी करून तो पाठविला जात आहे. पण त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद शनिवारी (ता.२३) आहे. यानंतर ‘स्वाभिमानी’ आंदोलनाबाबतची नेमकी भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यानंतरच कारखानदारांसोबत पुन्हा बैठक होणार आहे. सोमवारी (ता. २५) ही बैठक होणार असल्याने तोपर्यंत तरी ऊसतोडणी बंदच राहण्याची शक्‍यता आहे.

दररोज अनेक ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने अडविण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेकांनी गावपातळीवरच बैठका घेऊन तोडी स्वीकारू नका, असे आवाहन केले आहे. अद्यापही काही ठिकाणी पुरेसा वाफसा नसल्याने काही दिवस थांबले तरी फारसा फरक पडणार नाही, यामुळे आंदोलन मिटेपर्यंत आम्ही थांबणार असल्याचे काही कारखान्यांच्या सुत्रांनी सांगितले. अनेक कारखान्यांच्या शेती विभागातही आंदोलनामुळे शांतता आहे. येत्या काही दिवसांत तोडणी सुरू झाल्यास तोडणीसाठी चांगले प्लॉट शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती कारखान्यांच्या शेती विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com