पुणे जिल्ह्यात आठ हजार हेक्टरवरील उसाला फटका

Sugarcane hit over 8,000 hectares in Pune district
Sugarcane hit over 8,000 hectares in Pune district

पुणे : यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे ७३११ हेक्टर आणि अति पावसामुळे ८२८ हेक्टर अशा एकूण ८१३९ हेक्टरवरील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे केले आहे. मात्र अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. या ऊसपीक नुकसानीचा फटका साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा गळीत हंगामात कारखान्यांना कमी प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयातील सूत्रांनी दिली.  

जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण १८ साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा या उसाची सुमारे एक लाख ३७ हजार ९०४ हेक्टरवर लागवड झाली होती. जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात ऊसाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस चाऱ्यासाठी दिला.

शिवाय पाणीटंचाईमुळे सुमारे सात हजार ३११ हेक्टरवरील ऊस पीक जळाले. यामध्ये घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे दोन हजार, बारामती अॅग्रोचे एक हजार ११५, भीमा पाटस कारखान्याचे सुमारे एक हजार, संत तुकाराम कारखान्याचे ४५६, नीरा भीमा कारखान्याचे ७१३, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे २४७, माळेगाव कारखान्याचे ३७२, सोमेश्‍वर कारखान्याचे १७५, छत्रपती कारखान्याचे १२९, अनुराज शुगर्सचे १०३, व्यंकटेश शुगरचे १९४ हेक्टरवरील उसाचे क्षेत्र जळाले असल्याचे समोर आले आहे.  

आॅगस्ट, सप्टेबर आणि आॅक्टोबर महिन्यांत जोरदार पावसामुळे उजनी धरणाच्या परिसरातील उसाचे मोठे नुकसान झाले. पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील सुमारे ८२८ हेक्टरवरील ऊस बाधित झाला. यामध्ये भीमा पाटस कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ३८०, तर इंदापूर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १५१ हेक्टरवरील उसाचा समावेश आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होण्याची शक्यता असून, अवघ्या ८५ लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com