उसाची रसवंती ठरली उत्पन्नाची शाश्वती

sawant brothers sugarcane juice stall
sawant brothers sugarcane juice stall

कारखान्याला ऊस देणे परवडत नसल्याने हिंगळजवाडी (ता. जि. उस्मानाबाद) येथील सावंत बंधूंनी रसवंती व्यवसाय सुरू करून त्यात चांगलाच जम बसवला आहे. तीन टप्प्यात ऊसलागवड व चांगले व्यवस्थापन करून वर्षातील आठ महिने उपलब्ध होणारा मधुर व उत्तम दर्जाचा रस ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. उस्मानाबाद शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवर हिंगळजवाडी गाव आहे. येथे रस्त्याच्या कडेला गणेश सावंत यांची वडिलोपार्जित सुमारे २५ एकर शेती आहे. उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा असल्याने बोअरच्या जेमतेम पाण्यावर शेती होते. ज्वारी, गहू, हरभरा अशी पारंपरिक पिके ते घेतात. आई-वडिलांसह गणेश आपले बंधू गोविंद आणि सिद्धेश्वर त्यांच्या बरोबरीने शेतीत आहेत. ऊस रसवंतीचा पर्याय

  • सहा वर्षापूर्वी शालेय शिक्षण घेतल्यानंतर ‘आयटीआय’मधून मोटार रिवायंडिंगचा अभ्यासक्रम गणेश यांनी पूर्ण केला. शेती सांभाळत हा व्यवसायही ते पाहायचे. पण हाती समाधानकारक उत्पन्न लागत नव्हते.  
  • त्यातच २०१४ मध्ये ऊस घेतला. मोठ्या उत्साहाने त्यावर लक्ष केंद्रित केले. पण कमी गुणवत्तेचे कारण देत खासगी साखर कारखान्याने त्यांचा ऊस नाकारला. त्यामुळे गणेश यांचा हिरमोड झाला. या शिवाय कारखान्यांकडून मिळणाऱ्या दरांचा प्रश्‍नही होताच. पण संकटांनीच संधीचा मार्ग दाखवला.  
  • ऊस रसवंतीची कल्पना सुचली. घरच्यांनी विरोध केला. पण संपूर्ण अभ्यासाअंती व्यवसायाचा श्रीगणेशा झाला.
  • तीन टप्प्यांत ऊस लागवड

  • सावंत यांची रसवंती वर्षातील आठ महिने सुरू असते. त्यामुळे कायम ऊस उपलब्ध व्हावा यासाठी जून-जुलै, दिवाळी, फेब्रुवारी अशा तीन टप्प्यात उसाची लागवड करण्यात येते.  
  • तीन वर्षापासून पट्टा पद्धतीने लागवड केली जाते. उसाला बहुतांशी व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने केले जाते. चिपाड कुजवून त्याचे खत देण्यात येते. त्यातून जमिनीला सेंद्रिय कर्ब मिळतो. को ६७१ या वाणाला गोडी असल्याने त्याचीच लागवड होते. एकरी ५० टन उत्पादन मिळते असे गणेश सांगतात. रसवंतीच्या बाजूलाच शेत असल्याने उसाची वेगळी वाहतूक करावी लागत नाही.
  • आठ महिने रसवंती सुरू

  • साधारण ऑक्टोबरला रसवंती सुरू केली जाते. जून ते सप्टेंबर या पावसाळ्यातील चार महिन्यांच्या काळात रसवंती बंद असते. हिवाळ्यात रसाला तुलनेने कमी मागणी असली तरी रसवंती सुरूच असते. मार्च, एप्रिल आणि मे असे उन्हाळ्यातील तीन महिने सर्वाधिक मागणी असते.
  • दर्जेदार, चवदार रसाला पसंती

  • उस्मानाबाद-तेर मार्गावरील हिंगळजवाडीच्या चौकात रसवंती आहे. साहजिकच मार्गावरील प्रवासी येथे आवर्जून थांबतात. त्यासाठी सावलीची व्यवस्था केली आहे.  
  • सेंद्रिय पद्धतीवर भर असलेल्या उसाच्या या रसाला वेगळीच गोडी असते. ऊस गाळप केल्यानंतर त्यात लिंबू आणि काळे मीठ यांचा वापर केल्यानंतर त्याचा स्वाद अजून वाढतो. परिसरातील अनेक ग्राहक त्यांच्याकडून रसाचे पार्सलही ४० रुपये प्रति लिटर दराप्रमाणे घेऊन जातात.
  • दिवसाला पाचशे ग्लासेसची विक्री

  • सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या रसवंतीत दिवसभर ग्राहकांची रीघ सुरु असते. विशेषतः हंगामात मार्च ते मे महिन्यात सावंत बंधूंना रिकामी उसंत मिळत नाही.  
  • उन्हाळ्याच्या काळात कमाल ७००, ८०० ग्लासपर्यंत विक्री होते. वर्षभरातील दैनंदिन सरासरी ४०० ते ५०० ग्लासेसपर्यंत असते. यासाठी साधारण अर्धा टन ऊस दररोजचा तोडला जातो. ऊस घरचा असल्याने त्याचा खर्च नाही.  
  • वीज व डिझेल या दोन्ही पर्यायांचा वापर होतो. प्रति जंबो ग्लास १० रुपयांप्रमाणे विकला जातो.  
  • महिन्याला या व्यवसायातून लाख रुपयांचे उत्पन्न मिळून डिझेल, मजूर, अन्य खर्च वजा जाता महिन्याला ४० ते ४५ हजार रुपयांची कमाई या व्यवसायातून होते.
  • स्टीलच्या रसवंतीचा वापर

  • गणेश यांनी पुणे येथून नुकतेच स्टीलवर आधारीत गाळपयंत्र घेतले आहे. त्यासाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. या यंत्रामुळे उसाच्या रसाला काळसर रंग येत नाही. त्याची गुणवत्ता सुधारते असे त्यांनी सांगितले.
  • दिवसभराचे नियोजन

  • तिघे बंधू वेळेचे नियोजन करून रसवंतीची जबाबदारी पाहतात.  
  • रसवंतीचा परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो.  
  • सकाळी नऊनंतर सुरू झालेली रसवंती संध्याकाळी सातपर्यंत चालते.  
  • तत्पूर्वी दुपारी चार वाजता ऊस तोडणी होते. सुमारे १५ मोळ्या ऊस प्रतिदिन लागतो.
  • कौशल्य व कष्ट आले कामी

  • साखर कारखान्याला ऊस न्या म्हणून मागे लागण्यापेक्षा आणि टप्प्याटप्प्याने मिळणाऱ्या ऊसबिलासाठी कारखान्याच्या पाऱ्या झिजवण्यापेक्षा रसवंतीचा व्यवसाय सावंत बंधूंसाठी चांगलाच फायदेशीर ठरला आहे. कौशल्य, कष्ट, चिकाटी व सातत्य यांची तयारी ठेवल्यास रसवंतीचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.  
  • उसाला जोड म्हणून दरवर्षी सोयाबीन, हरभरा पिके असतात. यंदा जवळपास २० एकरांत सोयाबीन होते.  
  • त्यापासून एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
  • संपर्क- गणेश सावंत- ८५५१०२८४९३ गोविंद सावंत- ९८९०२४२२०९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com