पुणे जिल्ह्यात ऊस लागवडीला पाणीटंचाईची झळ

माझ्याकडे वडिलोपार्जित एकूण तीस एकर शेती आहे. दरवर्षी सर्व क्षेत्रावर ऊस लागवड करतो. सध्या पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. पुढील काळात पाण्याची स्थिती पाहता चालू वर्षी ऊस लागवड करण्याचे टाळले आहे. - अनिकेत खालकर, शेतकरी, जवळे, ता. आंबेगाव, जि. पुणे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः यंदा कमी झालेला पाऊस आणि ऑक्‍टोबरपासूनच सुरू झालेली पाणीटंचाई याची चांगलीच झळ ऊस लागवडीला बसली आहे. पुणे जिल्ह्यात ऊस लागवडी खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात अवघ्या ४५ हजार ६८१ हेक्‍टरवर लागवडी झाल्या आहेत. सरासरी लागवड क्षेत्राच्या तुलनेत विचार केल्यास यंदा लागवड क्षेत्रात ८४ हजार ९४९ हजार हेक्‍टरने घट झाली असल्याचे दिसून येते. 

पुणे जिल्ह्यात आडसाली, सुरू, पूर्वहंगामी, खोडवा ऊसाचे सरासरी एक लाख ३० हजार ६३० हेक्‍टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६४ हजार ९१६ हजार हेक्‍टरवर ऊस लागवड झाली होती. गेल्या वर्षीची तुलना केल्यास यंदा १९ हजार २३४ हेक्‍टर म्हणजेच जवळपास ३० टक्‍क्‍यांनी क्षेत्र घटले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील पूर्व भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. येत्या काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होईल. 

सध्या जिल्ह्यातील बहुतांशी गावे व वाड्यांवर जवळपास ५० टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये बारामती, दौंड, पुरंदर, शिरूर, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर या सात तालुक्‍यांचा समावेश असून येथील विहिरींतील पाणीपातळीतही चांगलीच घट झाली आहे. काही गावात विहिरी कोरड्या पडू लागल्या असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. त्याचबरोबर शेतीलाही पाणीटंचाईचा चांगलाच फटका बसू लागला आहे.

जिल्हयात जुन्नर, आंबेगाव, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर हे तालुके उसाचे आगार म्हणून ओळखले जातात. या तालुक्‍यात दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू उसाच्या लागवडी करून उत्पादन घेतात. काही शेतकरी खोडव्याचेही उत्पादन घेतात. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात दरवर्षी चांगली वाढ होते. यंदा कमी पावसामुळे आडसाली, पूर्वहंगामी व सुरू ऊसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला.

पाणीटंचाईमुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याच्या पूर्व व उत्तर भागात ऊस लागवडी ठप्प असून अनेक शेतकरी ऊस गाळप झाल्यानंतर खोडवा ठेवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जवळपास ४५ हजार हेक्‍टरवर उसाचे क्षेत्र असल्याचे दिसून येते. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची मोठी झळ बसल्यास लागवड झालेल्या उसाच्या क्षेत्रात आणखी घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या गळीत हंगामात ऊस उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.  आमची वीस एकर शेती आहे. यंदा साखर कारखान्याला गाळपासाठी दहा एकर ऊस असून दोन ते तीन खोडवा ठेवण्याचे नियोजन आहे. आगामी काळात पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता लक्षात घेऊन चालू वर्षी फक्त एक एकरावर ऊस लागवड केली आहे. एक महिन्यापूर्वी कालव्याला पाणी येऊन गेल्यामुळे सध्या पाण्याची स्थिती बरी आहे. परंतु, आगामी काळात चांगलीच पाणीटंचाई जाणवणार आहे, असे   बोरिबेल (ता. दौंड) येथील शेतकरी बाळकृष्ण ज्ञानदेव पाचपुते यांनी सांगितले.  

तालुकानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्‍टर)  

तालुका सरासरी क्षेत्र  लागवड क्षेत्र
हवेली  ९६०० २०२०
मुळशी  १८२० -
भोर  १४३०  ६४
मावळ १५७० ३९
वेल्हे २१० -
जुन्नर  ९६५० ६०४० 
खेड २९३० ११९८
आंबेगाव ३८३० १२४०
शिरूर १८,५७० ५७१२
बारामती १६१२० ८०७९
इंदापूर ३१,२०० ९२७९
दौंड ३१,२६० ९७२१
पुरंदर २४६० २२९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com