सातारा जिल्ह्यात आडसाली उसाची १६ हजार हेक्‍टरवर लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यात आडसाली ऊस लागवडीस वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात २५ जुलैअखेर १६ हजार ३९ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आडसाली ऊस लागवड क्षेत्रात ३०५५ हेक्टरने वाढ झाली आहे.

इतर पिकांच्या तुलनेत उसाला शाश्‍वत दर मिळत असल्याने जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढत आहे. प्रामुख्याने आडसाली ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. वेळेत उसाची तोडणी व्हावी; तसेच उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने आडसाली ऊस लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. पावसाने उघडीप दिल्याने खास करून जिल्ह्यातील पश्‍चिम भागात आडसाली ऊस लागवडीस वेग आला आहे.

जिल्ह्यात २५ जुलैअखेर १६ हजार ३९ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. को ८६०३२, एमएस १०००१, को व्हीएसआय ९८०५ या ऊस जातींची लागवड केली जात आहे. एफआरपीमध्ये वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांना पहिला हप्ता तीन हजार रुपयांदरम्यान द्यावा लागणार आहे. यामुळेही उसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. आॅगस्टपर्यंत आडसाली ऊस लागवडीचा कालावधी असतो.

गतवर्षी २८ जुलैअखेर १२ हजार ९८४ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली. या हंगामात आतापर्यंत १६ हजार ३९ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. ऊस लागवड क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३०५५ हेक्टरने वाढ झाली आहे. लागवडीसाठी अजूनही एक महिन्यांचा कालवधी बाकी असल्याने गत वर्षीच्या तुलनेत या हंगामात आडसाली उसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात कारखान्याच्या संख्येत वाढ झाली असल्याने ऊस न तुटण्याची भीती कमी झाली असल्याने क्षेत्रात वाढ होत आहे.

तालुकानिहाय आडसाली ऊस क्षेत्र (हेक्‍टर) ः सातारा ३४५४, पाटण ३९२३, कराड ३२६०, कोरेगाव १६३३, खटाव ८४७, फलटण २०५८, खंडाळा ४५०, वाई ४१४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com