पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८० हेक्टरवर लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या पावसाच्या खंडाचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. शेतकऱ्यांनी आडसाली उसाची उशिराने लागवड सुरू केली आहे. आतापर्यंत विभागात आडसाली उसाची आतापर्यंत ५१ हजार ६८० हेक्टरवर लागवड झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास या ऊस लागवडीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

पुणे विभागात मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी या धरणांमुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. इतर पिकांच्या तुलनेत ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांचा या पिकाकडे अधिक कल असतो. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी ऊस लागवडीवर भर देतात.

यंदा जून, जुलै महिन्यांत पावसाचा चांगलाच खंड पडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाएेवजी सोयाबीन, तूर, मूग आदी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांवर भर दिला. त्यामुळे ऊस लागवड क्षेत्रात घट झाल्याचे चित्र आहे. चांगला पाऊस झाल्यास या कालावधीत एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ऊस लागवड होते; परंतु यंदा सुरवातीच्या काळात कमी झालेल्या पावसामुळे ऊस क्षेत्रात घट झाल्याची स्थिती आहे.

पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी चार लाख १३ हजार ५८० हेक्टर क्षेत्र आहे. विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, पाथर्डी, राहाता या तालुक्यांत बऱ्यापैकी ऊस लागवड झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, पुरंदर या तालुक्यांत ऊस लागवड झाली आहेत. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, खेड, आंबेगाव या तालुक्यात अजूनही ऊस लागवड झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर या तालुक्यात ऊस लागवड झाली आहे. उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, सांगोला हे तालुके ऊस लागवडीपासून दूर असल्याचे चित्र आहे.

जिल्हानिहाय झालेली आडसाली ऊस लागवड (हेक्टर)
जिल्हा  सरासरी क्षेत्र आडसाली ऊस लागवड
नगर   १,२१,१८० २९,०३०
पुणे  १,३०,६३०  १५,४००
सोलापूर  १,६१,७७०  ७२५०
एकूण ४,१३,५८० ५१,६८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com