सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊस उत्पादन घटणार

भातशेतीपेक्षा ऊसशेती परवडत असल्यामुळे कोकणातील शेतकरी ऊसशेतीकडे वळला. परंतु वर्षभर पोसलेल्या उसाची वेळेत तोडणी झाली नाही, तर शेतकऱ्यांचे नुकसान होते. परिणामी शेतकरी ऊसशेतीपासून दूर जाऊ लागला आहे. - किशोर जैतापकर, ऊसउत्पादक शेतकरी
Sugarcane production in Sindhudurg district will decline
Sugarcane production in Sindhudurg district will decline

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात १५२० हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. त्यातून साधारणपणे ९० हजार टन उत्पादन अपेक्षित होते. परंतु, या वर्षी आतापर्यंत ४० हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. अजून २० ते ३० हजार टन ऊस उत्पादन मिळेल अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ऊसतोडणी न झालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत ऊस लागवडीखालील क्षेत्रात १८० हेक्टरने घट झाली आहे.

जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली तालुका कार्यक्षेत्रातील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा गळीत हंगाम २२ नोव्हेंबरपासून सुरू झाला. त्यानंतर सुरुवातीचे दहा दिवस जिल्हयात ऊसतोडणी कामगार आले नव्हते. त्यामुळे खऱ्या अर्थाने ऊसतोडणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाली.

पहिल्या टप्प्यात तोडणी अतिशय संथ होती. दीड महिन्यात १५ टक्केच तोडणी झाली. त्यानंतर कारखान्याकडून जिल्हयात ४५ ऊसतोडणी कामगारांचे समूह पाठविण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. 

कारखाना व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अजून ३० हजार टन उसाची तोडणी शिल्लक आहे. या वर्षी जिल्ह्यातून ९० हजार टन उत्पादन अपेक्षित होते. परंतु, सद्यःस्थितीत ६० ते ७० हजार टन ऊस उत्पादित होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या वर्षाचा (निडवा) आहे, त्या उसाची तोडणी होत नसल्यामुळे त्यांची नव्याने लागवड उशिराने होणार आहे.

ऊसतोडणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

सन २०१० ते सन २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. परंतु, त्यानंतर ऊसतोडणीचा मुद्दा ऐरणीवर आला. मजुरांच्या कमतरतेमुळे ऊस तोडणीला विलंब होवु लागला. त्यामुळे ऊस तोडणीवरून शेतकरी हातघाईवर येऊ लागले. त्यातही काही शेतकऱ्यांकडून पाळीपत्रक डावलून ऊसतोडणीचे आरोप होऊ लागले. त्यास कंटाळून शेतकरी ऊसशेतीपासून दूर जाऊ लागला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com