एकरकमी एफआरपीने 'कोल्हापूर'चा तिढा सुटला

एकरकमी एफआरपीने तिढा सुटला
एकरकमी एफआरपीने तिढा सुटला

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. १०) सुटला. भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये जादा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी कारखानदारांनी सांगितले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी पुकारलेले चक्काजाम आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यापुरते मागे घेतल्याचेही जाहीर केले आहे. पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील बंद असलेले सर्व कारखाने उद्या (ता. १२) पासून सुरू करणार असल्याचे कारखानदारांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस हंगाम तातडीने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून कारखान्यांकडून प्रतिटन २८०० ते ३००० रुपये एक रकमी एफआरपी मिळणार आहे.  दिवसभरात कारखानदार, कारखानदार व शेतकरी संघटना पुन्हा कारखानदार अशा चर्चेच्या फेरी झाल्यानंतर एक रक्कमी एफआरपी देण्यावर कारखानदारांचे एकमत झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी फारशी ताणाताणी न करता या निर्णयला संमती दर्शविली. खासदार राजू शेट्टी परगावी असल्याने ते या चर्चेत सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र बैठक़ीत होणारा प्रत्येक निर्णय दूरध्वनीद्वारे त्यांना कळविला जात होता. तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले जात होते.  गेल्या पंधरा दिवसांपासून हंगाम बंद असल्याने सर्वत्र अडचणीची स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात प्राबल्य असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १० ऐवजी ९.५  एफआरपीचा बेस करून एफआरपी अधिक २०० रुपये दराची मागणी केली होती. ही मागणी मान्य होर्इपर्यंत तोडण्या बंद करण्याचा इशारा दिला होता. पहिल्या दोन दिवसांच्या हिंसक घटनानंतर कारखानदारांनी स्वत:हून तोडी बंद ठेवल्या. कारखानदाराच्या यापूर्वी दोन बैठका झाल्या होत्या. त्यातून दराबाबतची निश्‍चिती झाली नव्हती. शनिवारी एका खासगी हॉटेलमध्ये कारखानदारांची बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी शेतकरी संघटनेच्या निवडक कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहावर बोलवून घेतले. शासकीय विश्रामगृह येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत पुन्हा बैठक झाली. यात काहीशा निर्णयापर्यंत आल्यानंतर कारखानदार परत हॉटेलमध्ये परतले. हॉटेलमध्ये पुन्हा अर्धा तास चर्चा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कारखानदार प्रतिनिधींनी हंगाम सुरू करण्याबाबत माहिती दिली.  कारखानदार प्रतिनिधी माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, की या परिस्थितीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबरच खासदार राजू शेट्टी यांच्याशीही फोन वर झाली. साखर दराचा अंदाज घेऊन आम्ही दोघांच्या मान्यतेने हे निर्णय घेतले. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही याची कल्पना आम्ही दिली आहे.    शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले की, काही कारखानदारांनी पुढाकार घेऊन यामध्ये तडजोड घडवून आणली. यानंतर हा निर्णय झाला. साखरेचा दर वाढण्याची शक्‍यता असल्याने मागणी केलेली २०० रुपयांनी रक्कम आम्हाला मिळेल. गेल्या हंगामातील शिल्लक रक्कम ताबडतोब देण्याचे कारखान्यांनी मान्य केले. यामुळे जिल्ह्यातील आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. एफआरपी बेस साडेनऊ करण्याची लढाई आमची सुरूच राहील. खासदार राजू शेट्टी हे यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही जिल्ह्यातील आंदोलन मागे घेत आहोत.  कारखानदार व शेतकरी संघटनेच्या चर्चेत श्री आवाडे, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, पी.एन.पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे, आदिसह विविध कारखान्याचे प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सावकार मादनाईक, राजेंद्र गड्यान्नवार, सागर संभूशेटे आदिंनी सहभाग घेतला.  कोल्हापूर वगळता आंदोलन सुरुच राहणार  उस दराचा तोडगा फक्त कोल्हापूर जिल्ह्यात निघाला आहे. राज्यातील इतर कारखान्यांनी भूमिका जाहीर न केल्याने आज (ता. ११) होणारे चक्का जाम व गावे बंद आंदोलन कोल्हापूर जिल्हा वगळता सुरूच राहाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील लक्ष्मी फाटा, पद्याळे फाटा, नांद्रे, कवठेएकंद, शिरढोण, पाचवा मैल, वसगडे, पलूस, अंकलखोप फाटा, म्हैसाळ, उड्डाणपूल, आष्टा, वाळवा फाटा, इस्लामपूर, ताकारी, बहे, किल्लेमच्छिंद्रगड, लाडेगाव फाटा, रेठरे आणि जत या ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणी ‘रास्ता रोको’ करण्याचे नियोजन केले आहे. ३००० रुपयांपर्यंत एफआरपी मिळणार जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हरी ११ ते १३ टक्के इतकी आहे. कारखाने विनाकपात एकरकमी एफआरपी देणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कारखान्यांच्या रिकव्हरीनुसार २८०० ते ३००० रुपयांपर्यंतचा दर मिळणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com