येत्या हंगामात पुणे विभागात मुबलक ऊस

येत्या हंगामात मुबलक ऊस उपलब्ध होणार
येत्या हंगामात मुबलक ऊस उपलब्ध होणार

पुणे ः यंदा उशिराने झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिल्याने चालू वर्षी ऊस क्षेत्रात सुमारे ६९ हजार ३३० हेक्टरने वाढ झाली आहे. आत्तापर्यंत विभागात आडसाली उसाच्या सुमारे दोन लाख ४० हजार १० हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. येत्या २०२०-२१ या वर्षाच्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना येत्या गळीत हंगामासाठी उसाची अडचण भासणार नसल्याची शक्यता आहे.  

पुणे विभागात मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी अशा काही धरणामुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. यंदा, ही सर्व धरणे चांगल्या झालेल्या पावसामुळे भरली होती. इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्वत उत्पन्न देणारे असल्याने अनेक शेतकरी खात्रीशीर पीक म्हणून पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी उसाच्या लागवडी करतात. जूनमध्ये दहा ते वीस, जुलै महिन्यात पावसाचा चांगलाच खंड पडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाऐवजी सोयाबीन, तूर, मूग आदी कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला आहे. त्यामुळे ऊस लागवडीत घट झाल्याचे चित्र होते. परंतु, उशिराने चांगला पाऊस झाल्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली. 

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात. पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी तीन लाख ७३ हजार १२९ हेक्टर क्षेत्र आहे. 

गेल्या वर्षी सुमारे एक लाख ७० हजार ६८० हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ६९ हजार ३३० हेक्टरने वाढ झाली आहे. विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, पाथर्डी, राहाता या तालुक्यात बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील  शिरूर, दौंड, बारामती, आंबेगाव, खेड, इंदापूर, हवेली, जुन्नर, पुरंदर या तालुक्यात लागवडी झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर या तालुक्यात उसाच्या लागवडी झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com