दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
अॅग्रो विशेष
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास दिवसे
पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी व्यावसायिक झाला पाहिजे. शेतमालाकडे व्यापारी माल समजून मागणीनुसार उत्पादन घेतले जावे. काढणीपश्चात तंत्रज्ञानावर भर देत प्रतवारी, पॅकेजिंग, गोदामे, शीतगृह, प्रक्रिया यांचाही विचार करावा लागेल. भविष्यातील किमतीचा अंदाज घेऊन विपणन कौशल्य निर्माण केले, तरच मूल्य साखळी तयार करता येईल. यासाठी कृषीसेवा, कषी उद्योगांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आवश्यक आहे, असे मत राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी व्यावसायिक झाला पाहिजे. शेतमालाकडे व्यापारी माल समजून मागणीनुसार उत्पादन घेतले जावे. काढणीपश्चात तंत्रज्ञानावर भर देत प्रतवारी, पॅकेजिंग, गोदामे, शीतगृह, प्रक्रिया यांचाही विचार करावा लागेल. भविष्यातील किमतीचा अंदाज घेऊन विपणन कौशल्य निर्माण केले, तरच मूल्य साखळी तयार करता येईल. यासाठी कृषीसेवा, कषी उद्योगांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आवश्यक आहे, असे मत राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
समाजशास्त्रे अभ्यास केंद्राच्या वतीने डॉ. अरुण कुलकर्णीलिखित ‘व्होलॅटीलिटी इन अॅग्रीकल्चर प्राईसेस’ या पुस्तकाच्या ई-बुक आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी (ता. १६) कृषी आयुक्त दिवसे यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भूषणा करंदीकर, अतुल ठकार या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. दिवसे म्हणाले, की शेतीक्षेत्रात प्रचंड अस्थिरता असून, केवळ आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सुटणार नाही. कर्जमाफी ही उत्पादक गुंतवणूक होऊ शकत नाही. हवामानबदलामुळे होणारी आव्हाने शेतीवर परिणाम करत आहेत. यातच उत्पादित मालाच्या किमती, कृषी निविष्ठांचे दर आपल्या हातात नाहीत. त्यामुळे कृषीक्षेत्र सक्षम झाले पाहिजे, तरच आपत्तींचा सामना करता येईल. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने धोरणे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. सोयबीन, कापूस, तूर, मका आणि कांदा ही पिके आता जागतिक उत्पादने झाली असून, जगभरातील बाजारपेठांचाही यावर परिणाम होत आहे. यातच कृषी आणि पूरक क्षेत्रात उत्पादन क्षमतेच्या मर्यादा आहेत. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी खर्च कमी करून, शेतमालाची गुणवत्ता सुधारली पाहिजे. नुकसान कमी करण्याबरोबरच प्रक्रिया करुन मूल्यवर्धन केले पाहिजे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्पादित मालाचे उत्कृष्ठपणे विपणन (मार्केटिंग) केले, तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल.
‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, की बाजारभाव हा कळीचा मद्दा झाला आहे. या अस्वस्थतेतून शेतकरी आंदोलने उभी राहत आहेत. शेतीमालाला भाव मिळण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या कमोडीटी मार्केटमध्ये पुढे येत असल्याचे चित्र अशादायक आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याच्या एकट्याच्या डोक्यावरच जोखीम राहते. या संकटांना तोंड देण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये विकसित करण्यासाठी, तसेच कृषी उद्योग आधारित समाज घडविण्यासाठी धोरणांची आवश्यकता आहे.
डॉ. अरुण कुलकर्णी म्हणाले, की शेतमालाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तिरता दिसून येत आहे. हंगामानुसार बदलणाऱ्या शेतमालाच्या भावातील चढ-उतार कमी करण्यासाठी यंत्रणा उभारली जावी. गेल्या ३७ वर्षांतील विविध प्रकारच्या शेतमालाच्या भावाचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. हंगामानुसार पिकांच्या भविष्यातील किमतींचा अंदाज घेण्यासाठी ते लाभदायक ठरणार आहे.
अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. भूषणा करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. अतुल ठाकर यांनी आभार मानले.