परभणी, हिंगोली जिल्ह्यांत जमिनीमध्ये गंधकाची कमतरता

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यांतील जमिनीमध्ये गंधकाची कमतरता आढळून आली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. सोयाबीन पिकाला एकरी ८ ते १० किलो गंधकाची देण्याची शिफारस करण्यात आली आहे. - एस. एच. पवार, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी, परभणी.
soybean
soybean

परभणी: परभणी-हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु, जमिनीमध्ये गंधकाचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. उत्पादकतावाढीसाठी सोयाबीनला मुख्य अन्नद्रव्यासोबत गंधक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देण्याची शिफारस करण्यात आली आहे.  परभणी येथील कृषी विभागाच्या मृदा सर्वेक्षण आणि मृदा चाचणी प्रयोगशाळेतर्फे २०१७-१८ आणि २०१८-१९ यावर्षी राष्ट्रीय मृदा आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ७४३ आणि हिंगोली जिल्ह्यातील ७०० गावांतील असे एकूण १ हजार ४४३ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील ४१ हजार ८९८ माती नमुन्याची तपासणी करण्यात आली. गेल्यावर्षी (२०१९) पासून या दोन जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत निवडक गावांमधील संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतातील माती नमुन्यांची तपासणी केली जात आहे. जमीन आरोग्य पत्रिका वितरित करून पिकांना मुख्य अन्नद्रव्ये तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा योग्य त्या प्रमाणात देण्याची शिफारस केली जात आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सर्व १४ तालुक्यांतील ७२.०१ ते ९२.१६ टक्के मृदा नमुन्यामध्ये गंधकाची कमतरता असल्याचे आढळून आले आहे.  परभणी जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ८८ हजार ६७० हेक्टर असताना गेल्या काही वर्षांत ते दोन लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८६ हजार ७८१ हेक्टर असताना पेरणी क्षेत्रात २ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. तेलवर्गीय पीक असल्यामुळे सोयाबीनची गंधकाची गरज जास्त आहे. प्रथिने, तेलाचे प्रमाण तसेच मूळांवरील जिवाणूंच्या गाठी वाढविण्यासाठी सोयाबीन पिकाला गंधक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची नितांत गरज असते. गंधकामुळे दाण्याची प्रत सुधारते उत्पादनात वाढ होते. अनेक शेतकरी कित्येक वर्षांपासून पिकांचा फेरपालट करत नाहीत. सोयाबीनचे पीक जमिनीतून गंधक उचलत आहे. परंतु, त्या प्रमाणात इतर खतांसोबत गंधकाची मात्रा दिल्या जात नाही. त्यामुळे सोयाबीनची प्रतिहेक्टरी उत्पादकता कमी झाली आहे.

दोन्ही जिल्ह्यांतील तालुकानिहाय गंधक कमतरता असलेल मृदा नमुने प्रमाण.. 

तालुका प्रमाण
परभणी  ७२.०१ 
जिंतूर  ८७.९० 
सेलू   ८६.६६ 
मानवत   ८३.१८ 
पाथरी  ८०.७२ 
सोनपेठ ८३.५९ 
गंगाखेड   ९१.०७ 
पालम ८४.७६ 
पूर्णा   ७७.०८ 
हिंगोली   ९२.१६ 
कळमनुरी ७६.३८ 
वसमत   ७८.४५ 
औंढा नागनाथ   ८७.३४ 
सेनगाव    ८४.०६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com