पुणे विभागात उन्हाळी पिकांची २८ टक्के क्षेत्रावर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पुणे विभागातील अनेक भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्याची झळ उन्हाळी हंगामातील पिकांना बसू लागली आहे. उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र २३ हजार ३०० हेक्टर असून, त्यापैकी सहा हजार ५०१ हेक्टर म्हणजेच २८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांच्या समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

यंदा कमी झालेल्या पावसाचा फटका रब्बी हंगातील पिकांना बसला आहे. त्यातच नोव्हेंबर-डिसेंबरपासून पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. कमी पावसामुळे भूजलपातळीत चांगलीच घट झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. कमी पावसाचा फटका उन्हाळी पेरण्यांना बसू लागला आहे. पाण्याची सुविधा असलेल्या भागात शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. विभागात उन्हाळी मक्याची १९५१, बाजरीची २५४९, उन्हाळी मुगाची १७, भुईमुगाची १९८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.  

विभागात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात चाराटंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारापिकांच्या पेरणीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात घट होत आहे. विभागातील नगर जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिकांच्या अल्प पेरण्या झाल्या असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील श्रींगोंदा, संगमनेर या तालुक्यांत पेरणी झालेली आहे. 

पुणे जिल्ह्यामध्ये  उन्हाळी बाजरी व भुईमूग पिकाच्या थोड्याफार प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. बाजरी, भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यात हवेली, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत पेरणी झाली आहे. सोलापूरमध्ये उन्हाळी मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. 

जिल्हानिहाय झालेली पेरण्या ः (हेक्टरमध्ये) 
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्के 
नगर   ८४०० ३४३ ४ 
पुणे    ६४६०   ४३४० ६७ 
सोलापूर ८४४० १८१८ २२ 
एकूण २३३०० ६५०१ २८ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com