जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
ताज्या घडामोडी
वाशीममध्ये उन्हाळी पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
या वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी पुढे आले आहेत. उन्हाळी मूग, भुईमूग, सोयाबीनची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
वाशीमः या वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी पुढे आले आहेत. उन्हाळी मूग, भुईमूग, सोयाबीनची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकट्या रिसोड तालुक्यात उन्हाळी पिकांची सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मूग, सोयाबीनपासून पुरेसे उत्पादन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली. काही शेतकरी आता तुरीचे पीक काढून उन्हाळी पिकांचे नियोजन करीत आहेत. या वर्षी उन्हाळी पिकांच्या लागवडीमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने उन्हाळी मूग व उन्हाळी भुईमूगाची पेरणी अधिक झाली आहे. उन्हाळी मुगाची पेरणी अजूनही चालू असून, उन्हाळी पिकाच्या क्षेत्रामध्ये अजूनही वाढ होणार आहे.
यावर्षी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे व खरिपाची पिके हातून गेल्यामुळे तालुक्यातील शेतकरी उन्हाळी पिकाकडे वळला आहे. रिसोडमध्ये उन्हाळी ज्वारी १६८ हेक्टर, मका ८३ हेक्टर, उन्हाळी मूग ४६०हेक्टर , उन्हाळी उडीद ९२.५ हेक्टर, सोयाबीन १८० हेक्टर, उन्हाळी तीळ १८ हेक्टर, उन्हाळी भुईमूग ५२७ हेक्टर तर भाजीपाला २२९ हेक्टर, उन्हाळी कांदा ३०९ हेक्टर, अशी या एकाच तालुक्यात २ हजार ७२ हेक्टरवर लागवड झाली आहे. उन्हाळी मुगाची पेरणी अद्यापही सुरू आहे. शेतकरी आणखी १५ दिवसांत अशा लागवडी करणार आहेत.
सोयाबिन लागवडीवर कृषी विभागाचा भर
खरिपातील सोयाबीनचा दर्जा खालावल्याने बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी या वर्षी प्रथमच उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. खरिपात सोयाबीन बियाणाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून सोयाबीन पेरणीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. कृषी विभागाकडून उन्हाळी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे.
प्रतिक्रिया
ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली आहे. येत्या हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून उन्हाळी सोयाबीन व इतर पिकांबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी १५ मार्चपर्यंतच उन्हाळी मुगाची पेरणी करावी.
-काव्यश्री घोलप, तालुका कृषी अधिकारी, रिसोड
- 1 of 1090
- ››