विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपार

सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात लागवड कमी झाली. परिणामी बाजार समित्यांमधील या पीकाची उलाढाल ठप्प झाली आहे.
sunflower
sunflower

नागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात लागवड कमी झाली. परिणामी बाजार समित्यांमधील या पीकाची उलाढाल ठप्प झाली आहे. विदर्भात सुमारे ३०० हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड होती. परंतु हमीभावाअभावी क्षेत्र सध्या शून्यावर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  पूर्व विदर्भातील नक्षलप्रवण गडचिरोली जिल्ह्याचे धान हे प्रमुख पीक. मात्र याच जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांनी तेलबिया वर्गातील सूर्यफुलाचा पर्याय निवडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सूर्यफूल लागवडीवर या भागातील शेतकऱ्यांचा भर होता. या भागात बाजारपेठ नसली तरी गडचिरोली पासून १३५ किलोमीटर अंतर असलेल्या उमरेड बाजार समितीत सूर्यफुलाची विक्री केली जात होती. सरासरी २५०० रुपये क्विंटलचा दर सूर्यफुलाला मिळत होता. उमरेड बाजार समितीत साधारणत: पाच ते सहा वर्ष सूर्यफुलाची नियमित आवक होती. चामोर्शी सोबतच चांगला दर मिळू लागल्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील सूर्यफूल लागवडीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे उमरेड बाजार समितीत दररोजची सूर्यफुलाची आवक पाच हजार पोत्यांवर पोचली होती.  मंगळवार, बुधवार, शनिवार असे तीन दिवस या बाजार समितीत सूर्यफुलाची खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले. परळी येथील व्यापारी सूर्यफूल खरेदीसाठी महिनाभर याच परिसरात वास्तव्यास राहत होते. सूर्यफुलावर आधारित प्रक्रिया उद्योग त्या भागात असल्याने येथून खरेदी केलेला माल प्रक्रिया उद्योजकाला पुरविल्या जात होता. उमरेड बाजार समिती सोबतच अमरावती तसेच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीत देखील सूर्यफुलाचे व्यवहार होत होते.   २०१६ पर्यंत सूर्यफुलाची आवक नियमित होती. त्यानंतर मात्र आवक मंदावली परिणामी व्यापारी देखील या बाजार समित्यांमध्ये फिरकेनासे झाले. लागवड क्षेत्र कमी झाल्याच्या परिणामी हे घडल्याचे सांगितले जाते. सद्यःस्थितीत राज्यात केवळ हिंगोली जिल्ह्यातील एक बाजार तसेच नंदुरबार बाजार समितीमध्ये सूर्यफुलाची आवक होत आहे. या भागातून गुजरातचे व्यापारी सूर्यफूल खरेदी करतात.

प्रतिक्रिया २०१६ पर्यंत बाजार समितीमध्ये सूर्यफुलाची नियमित आवक होती. महिनाभरात पाच हजार पोत्यांची आवक असायची. परळी येथील व्यापारी नियमितपणे बाजारात खरेदीसाठी येत होते. उमरेड सोबतच अमरावती आणि खामगाव बाजार समितीमध्ये देखील सूर्यफुलाच्या व्हायची. त्यानंतर आवक कमी होत गेल्याने व्यापारी देखील बाजार समितीकडे येईनासे झाले.  - प्रकाश महतकर, सचिव, बाजार समिती,  उमरेड, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com