कृषी उद्योजकतेला पाठबळ ः भुसे

उद्योजकांनी आता शेतकरीहिताच्या संकल्पना सरकारला कळवाव्यात. राज्य शासनदेखील ‘सकाळ ॲग्रोवन’च्या माध्यमातून कृषी उद्योजकतावाढीसाठी पाठबळ मिळवून देईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
Support for agri-entrepreneurship: Bhuse
Support for agri-entrepreneurship: Bhuse

ॲग्रोवन वृत्तसेवापुणे ः शेतकऱ्यांची मुले शून्यातून विश्‍व निर्माण करीत उद्योजक म्हणून पुढे येत असल्याचे चित्र गौरवास्पद आहे. या उद्योजकांनी आता शेतकरीहिताच्या संकल्पना सरकारला कळवाव्यात. राज्य शासनदेखील ‘सकाळ ॲग्रोवन’च्या माध्यमातून कृषी उद्योजकतावाढीसाठी पाठबळ मिळवून देईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. निमित्त होते ते दिमाखदार अशा ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’ वितरण सोहळ्याचे. 

पुण्यात बुधवारी (ता. २७) एका दिमाखदार सोहळ्यात या ‘ॲवॉर्ड्‌स’नी कृषी उद्योग क्षेत्रातील निवडक उद्योजकांना  तुतारीचा निनाद आणि टाळ्यांच्या गजरात गौरविण्यात आले. पुरस्कार्थींमध्ये खते, बियाणे, कीडनाशके, सूक्ष्मसिंचन, यंत्रे-अवजारे, रोपवाटिका अशा विविध क्षेत्रांत कर्तबगारी दाखविणाऱ्या शेतकरीपुत्र उद्योजकांचा समावेश होता. व्यासपीठावर ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे समूह संपादक श्रीराम पवार, ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते. 

कृषिमंत्री या वेळी म्हणाले, ‘‘केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये दीर्घ कालावधीचे आराखडे करण्याचा प्रयत्न राहील. मुळात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यक्तिशः शेतकऱ्यांचा उल्लेख अन्नदाता, अन्नदेवता म्हणून करतात. त्यामुळेच ‘पिकेल ते विकेल’ हे धोरण सरकारने स्वीकारले आहे. विविध योजना आम्ही एकाच छताखाली आणतो आहोत. पीकविमा, ‘महाडीबीटी’मधील त्रुटी सोडविल्या जात असून, भ्रष्टाचाराला संधी न मिळता थेट लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवत आहोत. गरीब शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट, अन्न प्रक्रिया अशा प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी आराखडे तयार केले जात आहेत. या वाटचालीत ‘ॲग्रोवन’ने आम्हाला आणखी मार्गदर्शन करावे.’’

कृषी व्यावसायिकता  धोरणात सहभागी होऊ ः पवार ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनीही उद्यमशील पुरस्कार्थींचे तोंडभरून कौतुक केले. ‘‘मुलांना, तरुणांना सुरुवातीपासूनच कामाची सवय, संधी आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. आम्ही भावांनी देखील भाज्या विकल्या. त्या अनुभवातूनच व्यवसायात यशस्वी होऊ शकलो. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात असे प्रशिक्षण किंवा कामाच्या संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची भूमिका ‘सकाळ माध्यम समूहा’ने ठेवली आहे. त्यातूनच सरपंच महापरिषद, शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण, टाटा-गुगलच्या माध्यमातून पावणेपाच लाख महिलांना इंटरनेटचे प्रशिक्षण असे विविधांगी उपक्रम आम्ही राबवीत आहोत,’’ असे श्री. पवार म्हणाले.माध्यम म्हणून टीका करण्याचे अधिकार कायम राखून समाजाची उद्यमशीलता व प्रगतीला हातभार लावणारे उपक्रम आम्ही राबवितो. कृषी क्षेत्रातील व्यावसायिकता, प्रयोगशीलता वाढीसाठी शासनाने धोरण ठरवावे. ते राबविण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी आम्हीदेखील सहभागी होऊ. त्यातून राज्य सुजलाम् सुफलाम् करूया, अशा अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांनी बंगल्यांना  दिले ‘ॲग्रोवन’ नाव ः चव्हाण  कृषी प्रगतीसाठी गेल्या १६ वर्षांची ‘ॲग्रोवन’ची वाटचाल आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट करताना ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी ‘ॲग्रोवन’मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असून, आजवर राज्यातील चार शेतकऱ्यांनी आपल्या बंगल्याचे नाव ‘ॲग्रोवन’ ठेवले आहे, असे सांगितले. तसेच कृषी उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने नेमके काय करायला हवे, याचा धांडोळा घेतला. कृषिमंत्र्यांनी तोच धागा पकडून प्रत्येक मुद्द्यावर मनमोकळी भूमिका मांडली. या सोहळ्यात योगेश सुपेकर यांनी बहारदार सूत्रसंचलन केले. या वेळी ‘ॲग्रोवन’चे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात व इव्हेन्ट्‍स) बाळासाहेब खवले, मुख्य व्यवस्थापक (वितरण) चंद्रशेखर जोशी, विजयश्री इव्हेन्ट्‍सचे निखिल निगडे, तसेच कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचा मानाचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या उद्योजकांचे राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आहे. हा पुरस्कार तुमचे बळ वाढविणारा असेल.‘ॲग्रोवन’ हा सामान्य शेतकऱ्यांपासून ते माझ्यासारख्या कृषिमंत्र्याचाही मार्गदर्शक आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा येतात व माझ्यासारख्या मंत्र्यांच्या चुकाही निदर्शनास आणल्या जातात. त्याची वेळोवेळी दखल घेत आम्ही सुधारणादेखील करीत असतो.  - दादा भुसे, कृषिमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com