‘तिच्या’ जिद्दीला परिश्रमाची जोड

तारकपूर आगाराच्या एसटी दुरुस्तीच्या वर्कशॉपमध्ये वर्षा गाढवे पुरुषांच्या बरोबरीने एसटी दुरुस्तीचे काम करतात.
तारकपूर आगाराच्या एसटी दुरुस्तीच्या वर्कशॉपमध्ये वर्षा गाढवे पुरुषांच्या बरोबरीने एसटी दुरुस्तीचे काम करतात.

नगर ः आईवडिलांच्या घरची परिस्थिती जेमतेम आणि लग्नानंतर सासरची परिस्थितीही तशीच. मात्र माहेर आणि सासरकडून पाठबळ मिळालं. त्यांच्याच जोरावर तीन वर्ष औरंगाबादेत रिक्षा चालवून शिक्षण पूर्ण केले अन्‌ संघर्षाचे टप्पे पार करत यशस्वी मोटार मेकॅनिक होता आले. नगरमधील तारकपूर आगारात पुरुषाच्या बरोबरीने काम करणाऱ्या उच्चशिक्षित औरंगाबादची वर्षा गाढवे यांचा संघर्षमय प्रवास प्रत्येक तरुणीला ‘आदर्शवादी’ ठरणारा आहे. महिला आता ‘चूल आणि मूल’ एवढ्यावर मर्यादित न राहता वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी झाल्या आहेत. पूर्णा (जि. परभणी) हे माहेर असलेल्या आणि औरंगाबाद सासर असलेल्या वर्षा संतोष गाढवे यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. वर्षाला दोन भाऊ असून भाऊ रिक्षा चालवतो, तर दुसरा आयटीआयचे शिक्षण घेत आहे. आई-वडील मोलमजुरी करतात. कधी वडीलही रिक्षा चालवतात. वर्षा बारावीला विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर आदर्श शिक्षिका होण्याच्या आशेने ‘डीटीएड’चे शिक्षण पूर्ण केले. काही दिवस एका खाजगी शाळेत नोकरी केली, मात्र पुरेसे वेतन मिळत नसल्याने ती नोकरी सोडली.  मार्च २०१२ मध्ये लग्न होऊन वर्षा औरंगाबादकर झाल्या. सासरची परिस्थितीही जेमतेमच. पती संतोष गाढवे औरंगाबादला आर्मी रिपोर्टिंग कार्यालयात कार्यरत आहेत. सासरे ब्रह्मदेव गाढवे हेही रिक्षा चालवतात. सुनेची शिक्षणाची धडपड पाहून ब्रह्मदेव गाढवे यांनी वर्षा यांना आटीआयमध्ये ‘इलेक्‍ट्रिक मेकॅनिक’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन दिला. वर्षा यांनी स्वतः काम करून शिक्षणाचा खर्च भागवावा, अशी घरच्या मंडळींची इच्छा. वर्षा यांनी मग सासऱ्यांकडून रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि इलेक्‍ट्रिक मेकॅनिक हा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच औरंगाबादमध्ये तब्बल तीन वर्ष रिक्षाचालक म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवीही घेतली अन्‌ पदवीधर झाल्या. आयटीआय चा ‘इलेक्‍ट्रिक मेकॅनिक’ अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर औरंगाबाद ‘एमआयडीसी’त एका कंपनीत वर्षभर ॲप्रेनटीशिप (प्रशिक्षण) केली. वर्षा आता नगरला तारकपूर आगारात चार महिन्यांपासून मोटार मेकॅनिक म्हणून काम करत आहेत. मुळात एसटीच्या वर्कशॉपमध्ये आतापर्यंत फक्त पुरुषच एसटी दुरुस्त करताना दिसायचे. आता नगरमध्ये वर्षा पुरुषांच्या बरोबरीने एसटीच्या दुरुस्तीचे काम करताना नजरेस पडतात. विशेष म्हणजे इलेक्‍ट्रिक मेकॅनिक हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असताना वर्षा यशस्वीपणे ‘मोटार मेकॅनिक’चे काम करत आहेत. ‘‘वर्षानुवर्ष अनुभव असलेले येथील जुने-जानते मोटार मेकॅनिक सहकार्य करतात. पुरुषांच्या बरोबरीने काम करताना चार महिन्यांत वर्षा यांची कामाबाबत कोणतीच तक्रार नाही,’’ असे आगारप्रमुख अविनाश कल्हापुरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com