औरंगाबादेत दोन ठिकाणी संशयास्पद खतसाठा जप्त

औरंगाबादेत दोन ठिकाणी संशयास्पद खतसाठा जप्त
औरंगाबादेत दोन ठिकाणी संशयास्पद खतसाठा जप्त

औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री व कन्नड तालुक्‍यांत ३० व ३१ मे रोजी केलेल्या कारवाईत संशयास्पद खतसाठा आढळून आला. याप्रकरणी खतसाठा जप्तीची कारवाई करून कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत वडोदबाजार व कन्नड पोलिसांत फिर्याद देण्यात आली. त्यानुसार संबंधितांवर गुन्हेही नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

श्री. गंजेवार म्हणाले, ‘‘फुलंब्री तालुक्‍यातील बाबरा परिसरात अनधिकृतपणे खताची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार ३० मे रोजी फुलंब्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी व खत निरीक्षक रामराव बेबरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, मोहीम अधिकारी प्रशांत पवार, सुदर्शन मामिडवार आदींनी बाबरा परिसरातील काही दुकानांना प्रत्यक्ष भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकरी यादव चोपडे हे त्यांच्या शेतात घेऊन गेले असता, त्यांच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये जी बी. ॲग्रो इंडस्ट्रीज, १७२३, जीआयडीसी पनोली, भरूच, गुजरात उत्पादित ऑरर्गनिक मॅन्युर नामक खताच्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २५ बॅग आढळून आल्या. चोपडे यांच्यासोबतच इतरही शेतकऱ्यांनी याची खरेदी नेमकी कुणाकडून केली याची विचारणा केली असता नवल पाटील यांचे नाव पुढे आले. या प्रकरणात खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कलम ७ चे उल्लंघन, कलम ५ व ३५ चे उल्लंघन, कलम २१ चा भंग, भारतीय दंड विधान १८६० चे कलम ४२० नुसार गुन्हा केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ताब्यात त्या बॅगा वापर व फेरफार न करण्याच्या अटीवर देऊन या प्रकरणी जी. बी. ॲग्रो इंडस्ट्री १७२३, जीआयडीसी पनोली भरूच, गुजरातचे मालक संचालक, जबाबदार व्यक्‍ती तसेच नवल पाटील यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची फिर्याद वडोदबाजार पोलिसात देण्यात आली.’’ त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचे श्री. गंजेवार म्हणाले.

दुसऱ्या प्रकरणात अनधिकृत खत विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीची पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक आशिष काळूशे यांच्यासह कन्नड पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेख रज्जाक शेख वजीर यांनी ३१ मे निमडोंगरी (ता. कन्नड) परिसरात गेले. त्या वेळी भास्कर गुळवे यांनी त्यांच्या घरी शिवप्रसाद कृषी सेवा केंद्रामार्फत साठवून ठेवलेली खते दाखविली. या पाहणीत खताच्या बॅगेवरील मजकुरावरून ते खत ऑरगॅनिक मॅन्युअर असून, गोदावरी ॲग्रो केमिकल्स अँड फर्टिलायझर कं. जी.आय.डी.सी. वघोडिया (जि. बडोदा, गुजरात)कडून उत्पादित झालेले असल्याचे आढळून आले. गोकूळ गावंडे यांनी शिवप्रसाद कृषी सेवा केंद्र उघडून दाखविले असता त्यांच्याकडे नॅचरल पोटॅश (ग्रॅनुलर) व नॅचरल पोटॅश (पावडरचा) अनुक्रमे १५० व १८ बॅगा आढळून आल्या. यापैकी नॅचरल पोटॅश या नावाचे खत हे म्युरेट ऑफ पोटॅश या खताची नक्‍कल करून विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आल्याचे श्री. गंजेवार म्हणाले. 

या प्रकरणात खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कलम ७,८,९ चे उल्लंघन, कलम ५ व ३५ चे उल्लंघन, कलम २१ चा भंग, अत्यावश्‍यक वस्तू कायदा १९५५ चे कलम सातनुसार शिक्षेस पात्र असणे, खताच्या व्याखेचा भंग, उत्पादकाने विनापरवाना विक्रेत्यामार्फत खताची विक्री करणे आदी सात प्रकारचे ठपके ठेवून कन्नड पोलिसात याविषयी फिर्याद देण्यात आली. त्यामध्ये माया ॲग्रो केमिकल प्लॉट नं. पीएपी-१० डी. ब्लॉक एमआयडीसी, शेंद्रा औरंगाबादचे मालक, संचालक, जबाबदार व्यक्‍ती तसेच शिवप्रसाद कृषी सेवा केंद्राचे चालक गोकूळ गावंडे व परवान्यातील जबाबदार व्यक्‍ती राहुल चव्हाण यांच्यावुरूद्ध कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद झाल्याचेही श्री. गंजेवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही कारवाईतील जप्त खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचेही श्री. गंजेवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com