बियाणे तपासणी उशिरा करण्याचे संशयास्पद आदेश

राज्यात सोयाबीन बियाण्यांबाबत सतत तक्रारी असताना प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी बियाण्यांचे नमुने उशिरा पाठवण्याचे संशयास्पद आदेश दिले गेले होते, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.
soybean seed
soybean seed

पुणे: राज्यात सोयाबीन बियाण्यांबाबत सतत तक्रारी असताना प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी बियाण्यांचे नमुने उशिरा पाठवण्याचे संशयास्पद आदेश दिले गेले होते, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. खते, बियाणे, कीटकनाशके उद्योगात दरमहिन्याला अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. या उद्योगांना परवाने देणे आणि प्रयोगशाळेत नमुने पाठवून कारवाई करण्याचे अधिकार कृषी खात्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाकडे आहेत. या यंत्रणेचा वापर गैरव्यवहारासाठी करणारी टोळीच कृषी विभागात कार्यरत आहे. प्रयोगशाळा, नमुने तपासणी, धाड टाकणे, अपील करणे या सर्व प्रक्रियेत ही यंत्रणा गुरफटली आहे. सोयाबीन बियाणे प्रकरण हा याच यंत्रणेचा नमुना समजला जातो. राज्यभर सोयाबीन बियाण्याचे नमुने तपासणीसाठी काढण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकात बदल केल्यास त्याचा परिणाम थेट बियाणे बाजारात होतो. वेळेत नमुने न काढल्यास शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा होण्याची भीती असते. तथापि, गुणनियंत्रण विभागाने संशयास्पद या वेळापत्रकात फेरफार केला होता, असे उघड होत आहे. ‘‘कृषी आयुक्तालयातील एका लॉबीने २०१९-२० मधील गुणनियंत्रणाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करताना एप्रिल व मे महिन्यात सोयाबीनचे नमुने काढू नका, प्रयोगशाळेत उशिरा नमुने पाठवा असा दबाव गुणनियंत्रण अधिकाऱ्यांवर आणला. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘‘एप्रिल, मे महिन्यात सोयाबीनची आर्द्रता सहा टक्क्यांपर्यंत कमी होते. त्याप्रमाणेच सोयाबीन बियाण्याचे कवच नाजूक असल्याने सदोष बियाणे हाताळणी झाल्यास त्याचा परिणाम उगवण शक्तीवर होतो, असा स्पष्ट उल्लेख गुणनियंत्रण विभागाने एका पत्रात (सो.वि.त.७०४-१९) केला आहे. याचाच अर्थ असा की उगवणीच्या समस्या उद्भवू शकतात, याचा देखील अंदाज कृषी विभागाला आला होता. ‘‘गुणनियंत्रण निरीक्षकांनी गुणवत्ता तपासणीसाठी एप्रिल व मेमध्ये प्रखर तापमानात नमुने काढण्याऐवजी जूनच्या सुरुवातीला नमुने काढावे. असे काढलेले नमुने बीजपरीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविल्यास अहवाल परिणामकारक येतील. यामुळे चांगल्या प्रतीचे व पुरेसे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होईल,’’ असा युक्तिवाद या पत्रात नमूद करण्यात आला होता. मुळात हे पत्र बियाणे तपासणी प्रक्रिया खिळखिळी कशी होईल याची पद्धतशीरपणे काळजी घेणारे होते. सोयाबीन बियाण्यांचे नमुने काढल्यानंतर किमान ६० दिवस प्रयोगशाळांचे अहवाल हातात पडण्यास लागतात. म्हणजेच जूनमध्ये नमुने काढल्यास निकृष्ट बियाण्यांचे अहवाल सप्टेंबरमध्ये हाती येतात. त्या आधी जरी अहवाल मिळाले तरी असे बियाणे बाजारात शेतकऱ्यांच्या हातात पडण्याची भीती जास्त होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

कोणत्या संशोधन संस्थेने केली शिफारस? मुळात सोयाबीनचे नमुने जूनमध्ये काढण्याबाबत कोणत्या राष्ट्रीय संशोधन संस्थेची शिफारस कृषी आयुक्तालयाने मागवली होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रयोगशाळांमध्ये बियाणे तपासणीसाठी पाठविण्याचे वेळापत्रक बदलण्याचे आदेश कोणी दिले होते, वेळापत्रक बदलल्यामुळे प्रयोगशाळेतून अंतिम अहवाल वेळेत मिळतील, यामुळे निकृष्ट बियाणे बाजारात जाणार नाही असा ठाम निष्कर्ष कशाच्या आधारे काढला गेला, असेही प्रश्न निरीक्षकांनी उपस्थित केले आहेत

प्रतिक्रिया देशातील सोयाबीन वाणांच्या शृंखलेतील दोन जाती मी तयार केल्या आहेत. माझ्या शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासाठी पहिली तपासणी बियाणे तयार होत असताना शक्यतो नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये व्हावी. दुसरी तपासणी एप्रिल,मेमध्येच होणे अत्यावश्यक आहे. जूनमध्ये होणारी तपासणी अजिबात उपयुक्त ठरू शकत नाही.”  - डॉ.एस.के.दापके, सोयाबीन पैदासकार व निवृत्त संशोधक, अखिल भारतीय समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्प, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com