आदिवासी पाड्यावरील मधुमक्याची रशियात निर्यात

यापूर्वी गहू, टोमाटो, वांगे, भाजीपाला असे पीक घेत असायचो. मात्र आत्माकडून पिकाबद्दल सुचविल्यानंतर मधुमक्याची लागवड केली. डावणी, भुरी यांसारख्या रोगांचा प्रभाव मक्यावर होत नाही. इतर पिकांच्या तुलनेत लागवड, खते व औषधांचा खर्च व मेहनतही कमी आहे. आता आमचा मका रशियात गेला आहे. - गंगाधर अमृता गावंडे, शेतकरी, गावंधपाडा, ता. पेठ
मधुमका निर्यात
मधुमका निर्यात

नाशिक : नाशिक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) नाशिक यांच्या पुढाकाराने पेठ तालुक्यातील आदिवासी भागात शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत माधुमक्याची लागवड केली आहे.  बर्गर, पीझा, कॉर्नसूप, कॉर्न मंचुरियन या खाद्यपदार्थ बनविण्यामध्ये मधुमक्याचा वापर केला जातो. शेतकऱ्यांचा मधुमका एक्स्पोर्ट कंपनीच्या माध्यमातून रशियासाठी निर्यात केला जात आहे. त्यामुळे आदिवासी पाड्यावरील मका थेट परदेशात निर्यात होऊ लागलेला आहे. अवघ्या तीन महिन्यांत काढणीसाठी येणारे हे पीक इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चाचे व अधिक उत्पन्न देणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नाशिक आत्मा विभागाने पेठ तालुक्यात १०० एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक लागवड केली असून, ती यशस्वी झाली आहे. आदिवासी भागात असलेली पाणीटंचाई व पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून हे पीक निवडण्यात आले आहे. आत्माच्या पुढाकाराने हे पीक प्रात्यक्षिक स्वरूपात लावण्यात आले हे. मधुमक्याच्या लागवडीमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना टोमॅटो, वांगे, गहू, हरभरा या पिकांना पर्यायी पीक मिळाले आहे. यासाठी आत्माच्या वतीने लागवड केलेल्या शेतकऱ्याला प्रत्येकी एकरी ४ हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. या माध्यमातून बियाणे, खते व औषधे देण्यात आले आहे.   मधुमक्याला एकरी १५ ते १६ हजार खर्च लागवडीसाठी आहे. किफायतशीर उत्पादन व यांसह जनावरांसाठी भरपूर चारा तयार होतो. त्यामुळे पेठ तालुक्यात आदिवासी पाड्यांवरील शेतकऱ्यांनी पाणीटंचाईचा विचार करून मधुमक्याची लागवड केली. या आधी रब्बी हंगामात गहू, हरभरा साधा मका, ज्वारी यासारखी पिके घेतली जात होती. मात्र दुहेरी फायद्यामुळे मधुमक्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. आत्मा विभागाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एका एक्स्पोर्ट कंपनीबरोबर खरेदीची हमी पद्धतीने व्यवहार केला आहे. त्यामुळे या निर्यातदार कंपनीच्या माध्यमातून थेट बांधावर खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाबरोबरच विक्रीचा शाश्वत पर्यायही उपलब्ध झाला आहे. एकरी ५ ते ६ टन उत्पादन शेतकऱ्यांनी काढलेले आहे. त्याला प्रतिकिलो ८.५ ते ९  रुपये जागेवर भाव ठरवून घेण्यात आला आहे. एकरी सरासरी ५०,००० ते ६८,००० हजार एकरी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. बाजारात सध्या मक्याला उठाव असून, भाव वाढत असल्याने अधिक भाव मिळण्याची शक्यता आहे. यासह एकरी ४ ते ५ टन चारा उपलब्ध होत आहे. त्याचा प्रती टन भाव ३ ते ४ हजार रुपये आहे.  घरगुती जनावरे किंवा विक्रीसाठी पर्याय उपलब्ध आहेत. या प्रात्यक्षिक लागवडीसाठी आत्माचे प्रकल्प संचालक व नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ, आत्मा प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी शीलानाथ पवार, गट तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार व कृषी मंडळ अधिकारी श्री. महाजन यांनी आदिवासी शेतकऱ्यांना लागवडीसाठी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.

  •    निवडलेले शेतकरी ः १००
  •     एकूण क्षेत्र ः १०० एकर
  •     प्रती एकरी अनुदान ः ४००० रु.
  •     एकरी खर्च ः १५ ते १६ हजार
  •     उत्पादन ः ५ ते ६  टन
  •     दर प्रती किलो ः ८.५ ते ९ रुपये
  • आत्माचा प्रात्यक्षिक प्रयोग उत्पादन खर्च कमी, कमी पाण्यात येणारे पीक, पिकासोबत जनावरांना चारा उपलब्ध असल्याने व इतर पिकांच्या तुलनेत रोग कमी असल्याने शेतकऱ्यांनी हे पीक स्वीकारले.

    प्रतिक्रिया

    पेठ तालुक्यात पीक प्रात्यक्षिक म्हणून १०० एकर क्षेत्रावर स्वीटकॉर्नची लागवड केली आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांसमोर हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी प्रतिसाद देत भरघोस उत्पादन घेतले आहे. शिवासाई एक्स्पोर्ट कंपनीच्या माध्यमातून विक्रीचा पर्यायही दिल्याने शेतकरी समाधानी आहेत. - कैलास शिरसाठ, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, नाशिक.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com