सीताफळापासून सीरप, कुल्फी, फ्रिज ड्राइड उत्पादने

सीताफळापासून सीरप, कुल्फी, फ्रिज ड्राइड उत्पादने
सीताफळापासून सीरप, कुल्फी, फ्रिज ड्राइड उत्पादने

बुलडाणा : जिल्ह्यातील जानेफळ शेतकरी उत्पादक कंपनीने सीताफळ विक्रीच्या बरोबरीने प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला आहे. कंपनीने बाजारपेठेची गरज ओळखून यंदाच्या हंगामात कुल्फी, सीरप आणि फ्रिज ड्राईड सीताफळ या उत्पादनांची निर्मिती केली. सध्या प्रायोगिक तत्त्वावर विविध भागातील कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत उत्पादने पाेचविण्यास शेतकरी कंपनीने सुरवात केली आहे.  याबाबत माहिती देताना अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक, प्रशिक्षण व संशोधन संघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी म्हणाले, की सीताफळाची टिकवण क्षमता कमी असल्याने लगेच बाजारपेठेत विक्री करावी लागते. प्रतवारी करून मोठ्या फळांची विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळतो. दुसऱ्या, तिसऱ्या प्रतीची तसेच पिकलेल्या फळांचा वापर प्रक्रियेसाठी करून मूल्यवर्धन शक्य आहे. बाजारपेठेत सीताफळाचा गर काढणारे यंत्र आणि साठवणूक तंत्र उपलब्ध आहे.  गेल्या काही वर्षांत हॉटेल आणि प्रक्रिया उद्योगाकडून रबडी, आईस्क्रिम, मिल्क शेकसाठी सीताफळ पल्पची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सीताफळाच्या मूल्यवर्धनासाठी जानेफळ शेतकरी उत्पादक कंपनीने यंदाच्या हंगामात सीरप आणि फ्रिज ड्राय सीताफळ ही नवीन उत्पादनांची निर्मिती करून बाजारपेठेत प्रायोगिक तत्वावर वितरण सुरू केले आहे. या उत्पादनांची टिकवणक्षमता चांगली असल्याने शहरी ग्राहकांच्याकडून मागणी वाढत आहे. शेतकरी कंपनीची आत्माअंतर्गत नोंदणी झालेली असून त्यामध्ये २८२ शेतकरी आहेत. कंपनीने यंदाच्या हंगामापासून सीताफळ पल्पनिर्मितीला सुरवात केली. प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी शेतकरी कंपनीला आत्माकडून अनुदान मिळाले आहे. 

यंदाच्या हंगामात कंपनीने ४००० किलो सीताफळ पल्पची निर्मिती केली. आईस्क्रिम उद्योग, हॉटेल व्यावसायिकांना १७० ते २०० रुपये किलो या दराने पल्पची विक्री केली जाते. शहरी बाजारपेठेत सीताफळ पल्प ३०० रुपये किलोपर्यंत विकला जातो. जानेफळ शेतकरी उत्पादक कंपनीने नुकतीच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रदर्शनामध्ये सीताफळ कुल्फी आणि सीताफळ शेक विक्रीस प्रारंभ केला. या उत्पादनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीताफळ संघाच्या पुढाकारातून राज्यात ७० पल्पनिर्मिती उद्योगांना सुरवात झाली असून येत्या तीन वर्षांत गावपातळीवर ३०० पल्पनिर्मिती उद्योगांच्या उभारणीचा संघाचा प्रयत्न आहे. 

अशी आहेत उत्पादने ः १) सीताफळ सीरप ः

  • फ्रीजमध्ये तीन महिने टिकवण क्षमता.
  • पाचशे मिलि बाटलीमध्ये पॅकिंग.
  • वापर ः  ५०० मिलि सीरप हे १५०० मिलि दुधात मिसळून मिक्सरमधून फिरवल्यावर एकजीव होऊन मिल्कशेक तयार होतो. सीरपमध्ये साखर मिसळलेली असल्याने पुन्हा मिसळण्याची गरज नाही.
  • २) फ्रीज ड्राईड सीताफळ ः 

  • सीताफळाचा गर काढून विशिष्ट तंत्रज्ञानाने फ्रीज ड्राय करण्यात येतो.
  • साधारणपणे ४०० किलो सीताफळापासून १०० किलो गर मिळतो. त्यापासून २२ किलोपर्यंत फ्रिज ड्राय सीताफळ तयार होते.
  • वापर ः  ३०० मिलि दुधात २० ग्रॅम फ्रिज ड्राय सीताफळ मिसळून पाच मिनिटे थांबावे. त्यानंतर मिक्सरमधून मिश्रण फिरवावे. याचा चांगला गर तयार होतो.
  • मिल्कशेक, चॉकलेटनिर्मितीसाठी मागणी.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com