ताकारी उपसा सिंचन योजनेचे फक्त आठच पंप सुरू 

ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन १२ दिवस झाले तरीही या लाभ क्षेत्रातील गावांना पाणी मिळत नाही. अगोदरच दुसरे आवर्तन सुरू करण्यास विलंब झाला आहे.
  ताकारी उपसा सिंचन  योजनेचे फक्त आठच पंप सुरू Takari Upsa Irrigation Only eight pumps of the scheme started
  ताकारी उपसा सिंचन  योजनेचे फक्त आठच पंप सुरू Takari Upsa Irrigation Only eight pumps of the scheme started

सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन १२ दिवस झाले तरीही या लाभ क्षेत्रातील गावांना पाणी मिळत नाही. अगोदरच दुसरे आवर्तन सुरू करण्यास विलंब झाला आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेचे अवघे आठच पंप सुरू करून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेवटच्या लाभक्षेत्राला पाणी मिळण्यास उशीर लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

मागील महिन्यात २० फेब्रुवारीला ताकारी योजनेचे दुसरे आवर्तन सुरू होऊन पाणी मुख्य कालव्यातून वाहू लागले. या आवर्तनाला सव्वा महिना उशीर झाल्याने पाण्याचा खडखडाट होऊन उभी पिके करपली होती. जमिनीतील पाणीपातळीत खालावल्याने कालव्यातून पाणी पुढेच सरकत नव्हते.

सध्या योजनेचे एकूण ८ पंप सुरू आहेत. यापैकी ३ पंपांचे पाणी टप्पा ३ मधून सोनहिरा खोऱ्यातील गावांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य कालव्यात केवळ ५ पंपांचेच पाणी वाहत आहे. सुरुवातीपासून सर्व पोटकालव्यांची दारे खुली असल्याने कालव्यात पाण्याची उंची व दाब कमी आहे. कोणत्याही पोटकालव्यातून पुरेशा दाबाने पाणी वाहत नाही. 

वांगी परिसरात टंचाई  त्यामुळे वांगी भागाला पाणी पुरविणाऱ्या वितरिका क्र.९, १०, ११, १२, १३ आणि १४ चे सिंचनक्षेत्र पूर्ण भिजलेले नाही. याच दाबाने पाणी राहिल्यास ते भिजणारही नाही. या पूर्वी योजनेचे एकूण ११ पंप सुरू केल्याशिवाय सर्व वितरिकांना भरपूर पाणी येत नसे. हा इतिहास अधिकाऱ्यांनी समजून घेऊन वितरणाचे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा तासगाव तालुक्‍यात पाणी पोहोचायला किमान दोन महिने लागतील. तासगाव आणि मिरज तालुक्यात पाणी पूर्ण दाबाने सोडण्यासाठी योजनेतील सर्व पंप सुरू करण्याची आवश्यकता आहे. तरच या भागात वेळेत पाणी मिळेल. 

प्रतिक्रिया ताकारी योजनेचे आणखी तीन पंप आजपासून सुरू केले जाणार आहेत. जेणेकरून पाणी गतीने आणि आवश्‍यक दाबाने वितरिकातून वाहेल. सर्व शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल. सर्वांनी निश्चित रहावे. पाणी पुरेसे दिल्याशिवाय योजना बंद होणार नाही. 

-संजय पाटील, शाखा अभियंता (सिंचन). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com