ठिबक सिंचन योजनेतील घोटाळेबाजांवर कारवाई करा

Take action on fraudulent irrigation scheme scammers
Take action on fraudulent irrigation scheme scammers

बुलडाणा ः राज्य शासनाने पंतप्रधान सिंचन योजना बुलडाणा जिल्ह्यात राबविली असून त्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी व ठिबक विक्रेते यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहिले आहे. वंचित ठेवलेल्या लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यासाठी या घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात याबाबत निवेदन देण्यात आले. 

संघटनेने म्हटले, की शासनाने राज्यभर ठिबक सिंचन योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविली. सिंचनाच्या माध्यमातून आर्थिक मदत होईल यासाठी या योजनेतून सिंचनासाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. मात्र, या योजनेचा खरा आर्थिक फायदा जिल्ह्यातील कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच परवानाधारक ठिबक सिंचन विक्रेते यांनी स्वार्थासाठी करून घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. खऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून डावलण्यात आले. 

जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत मोठ्या संख्येने बनावट शेतकरी दाखवून, योजनेच्या निकषांप्रमाणे ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर करण्यात आले. एक लाभार्थी हा तब्बल तीन वर्षे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रात वीज वितरण कंपनीचा वीजपुरवठादेखील नसून त्यांचे बनावट नावे ठिबक सिंचन पद्धतीच्या प्रस्तावामध्ये दाखवून त्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. सिंचन विक्रेत्यांनी टक्केवारी घेऊन बनावट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. निवेदन देताना प्रशांत डिक्कर, मोहन पाटील, राणा चंदन, रोशन देशमुख, पवन देशमुख, शेख रफिक आदि उपस्थित होते.

जिल्हाभर आंदोलनाचा इशारा जिल्ह्यातील खरे लाभार्थी मात्र या योजनेच्या लाभापासून अद्यापही वंचितच आहेत. संबंधित कर्मचारी व ठिबक विक्रेत्यांनी बनावट लाभार्थी दाखवून शासनाचे अनुदान लाटले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कृषी विभाग व परवानाधारक ठिबक सिंचन विक्रेते यांची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध गुन्हे  दाखल करावेत. वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे शासनाकडे थकीत असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे. निधी वसूल करावा अन्यथा १० दिवसांत संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्यांच्या हितासाठी जनआंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com