चारा, पाण्याच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहा : सहकारमंत्री देशमुख

चारा, पाण्याच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहा : सहकारमंत्री देशमुख
चारा, पाण्याच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहा : सहकारमंत्री देशमुख

सोलापूर : टंचाईची तीव्रता वाढते आहे. अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती न देता आणि घेता, योग्य पद्धतीने ही परिस्थिती हाताळावी. पिण्याचे पाणी, जनावराचा चारा या मुख्य प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहा, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी (ता.२४) दिल्या. 

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील टंचाईचा आढावा सहकारमंत्री देशमुख यांनी घेतला. बैठकीसाठी दक्षिण सोलापूरच्या सभापती सोनाली कडते, उत्तर सोलापूरच्या उपसभापती रजनी भडकुंबे, दक्षिण भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, प्रांताधिकारी ज्योती पाटील, उत्तरचे तहसीलदार विनोद रणावरे, दक्षिणचे तहसीलदार अमोल कदम उपस्थित होते. 

पाण्याच्या प्रश्‍नाबरोबरच मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या. ज्या मजुरांना काम पाहिजे, त्यांनी ग्रामसेवकाकडे न जाता गटविकास अधिकारी, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडे कामाची मागणी करावी. मजुरांचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत त्यांना काम उपलब्ध करून दिले जाईल, असे या वेळी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले. 

 वडाळा येथे दररोज एक लाख सहा हजार लिटर पाण्याची आवश्‍यकता आहे. एक लाख लिटर पाणी त्यांच्या पाणीपुरवठा स्त्रोतांद्वारे उपलब्ध होते. उर्वरित सहा हजार लिटर पाण्यासाठी विहीर अधिग्रहण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र, त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा त्याला विरोध आहे. शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बीबीदारफळ व गावडीदारफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. दोड्डी, शिंगडगाव (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणीही पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या. देगाव जलसेतूचे काम पूर्णत्वाकडे आहे. वडापूर बॅरेजेसचे डिझाईन पूर्ण झाले, असेही जगताप यांनी सांगितले.

गावामध्ये पाण्यासाठी टॅंकरची आवश्‍यकता असल्यास त्याचा प्रस्ताव त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडे द्या. रानमसले येथे टॅंकरची मागणी करूनही तो दिला नसल्याचे माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित पवार व भाजपचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com