कीटकनाशकांच्या फवारणीवेळी खबरदारी घ्या : कृषी विभाग

संरक्षक कीटचा वापर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, खबरदारी घेऊनही विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार करून त्यासंदर्भात शासकीय यंत्रणेला कळविणे आवश्यक आहे.
कीटकनाशकांच्या फवारणीवेळी खबरदारी घ्या : कृषी विभाग

मुंबई: यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांत कापूस व सोयाबीनवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा झाली. या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत कीटकनाशकांची फवारणी करताना खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच विषबाधा झालेल्या व्यक्तींची शासकीय यंत्रणेला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहनही कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी केले आहे.   अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी कीटकनाशकांची अथवा कीडनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. संरक्षक कीटचा वापर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, खबरदारी घेऊनही विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार करून त्यासंदर्भात शासकीय यंत्रणेला कळविणे आवश्यक आहे. तसेच कीटकनाशकांची फवारणी करताना सर्व शेतकरी व शेतमजूर यांनी हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी इत्यादीचा वापर करावा.  कीटकनाशकांची फवारणी शेतमजुरांमार्फत केली जात असताना शेतमजुरांना संरक्षक कीट पुरवून, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्याची जबाबदारी शे‍तमालकाची आहे. कीटकनाशकांची फवारणी करतेवेळी प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवावे. पिकावर कीटकनाशकांची फवारणी शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये कीटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

फवारणी करताना वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करून फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्याचा फवारा मोठ्या प्रमाणात शरीरावर पडून शरीरात विष भिनण्याची शक्यता असते. फवारणी करताना जवळपास अन्य असंबंधित व्यक्ती अथवा जनावरे असणार नाहीत याची काळजी घ्यावी. ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरिन गटातील कीटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी.) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. फवारणी करताना कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहिती पत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच कीटकनाशकांचे पाण्यामध्ये मिश्रण तयार करताना कंपनीने दिलेल्या प्रमाणानुसारच मिश्रण तयार करावे. शेतमालकाने माणुसकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती कृषी सहायकाला अथवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला अथवा तहसीलदार यांना अथवा पोलिस ठाणे अंमलदारास अथवा आरोग्य अधिकाऱ्याला अथवा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्याला अथवा जिल्हा शल्यचिकित्सकाला अथवा जिल्हाधिकारी यांना तातडीने माहिती कळवावी, असे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्‍यक कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर, शिल्लक राहिलेले कीटकनाशक, कीटकनाशकाचे डबे, पॅकिंग, बॉक्स, इत्यादी साहित्य काळजीपूर्वक नष्ट करावे अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे. कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमालकाने अथवा शेतमजुरांनी फवारणी दरम्यान, अथवा फवारणी पूर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये.

शेतमालकाने कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुराची सरकारी दवाखान्यामार्फत वर्षातून किमान एकदा शारीरिक तपासणी करून घ्यावी. या मार्गदर्शक सूचनांचे पालन शेतकरी व शेतमजूर यांनी करणे आवश्यक आहे, जेणेकरून संभाव्य जीवितहानी टाळता येऊ शकेल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com