मोसंबीवर साल खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

Mosambi
Mosambi

औरंगाबाद : बहुतांश मोसंबी बागांमध्ये झाडांवर मटका साल खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. गंगापूर तालुक्यात क्षेत्रभेटीदरम्यान मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली. ‘‘अलीकडे मोसंबी बागावर साल खाणाऱ्या किडीचा गंभीर स्वरूपाचा उपद्रव होत आहे. त्याचा झाडांवर व उत्पादन क्षमतेवर अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन अळीचे नियंत्रण करणे फायदेशीर ठरेल,’’ असे मत डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. कृषी विभागातर्फे पिंपरी (ता. गंगापूर) येथे नुकतेच आयोजित मोसंबी प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते.  या वेळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ कृषी अधिकारी बाबासाहेब टेमकर, कृषी तंत्रज्ञान तालुका व्यवस्थापक दिलीप मोटे, कृषी सहायक सुनील निकम आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘८ ते १०वर्ष वयाच्या व दुर्लक्षित मोसंबी बागावर साल व खोड खाणाऱ्या अळीचा प्रकोप दिसतो. ही मोसंबी बागावरील गंभीर समस्या असून मराठवाड्यातील बागा यामुळे नष्ट होण्याची भीती आहे. या किडीची बागायतदारांनी वेळीच दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक भागांमधील दरवर्षी २ ते ४ मोसंबी झाडे यामुळे नष्ट होत आहे. याचा विपरीत परिणाम झाडाच्या उत्पादन क्षमतेवर होत आहे.’’  ‘‘झाडाच्या छिद्रामध्ये वाकलेल्या ताराने या किडीला मारले जाऊ शकते. या किडीचा शेतकऱ्यांनी वेळीच बंदोबस्त करावा,’’ असे प्रतिपादन ज्ञानेश्वर तारगे यांनी केले. या वेळी राजू डोंगरजाळ, चंदन बेडवाल, इर्शाद पटेल, कडू शेख, सचिन सोलट, दिलीप मोरे आदी शेतकरी उपस्थित होते. आंबा बागामध्येही प्रादुर्भाव ‘‘मोसंबी बरोबरच आंबा बागांमध्ये साल खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही बाब मोसंबी बागा बरोबरच आंबा बागायतदारांसाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची,’’ असल्याचे डॉ. संजय पाटील यांनी स्पष्ट केले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com