agriculture news in marathi Takes Oath for agriculture, water conservation and education   | Agrowon

शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसा

माणिक रासवे
रविवार, 26 जानेवारी 2020

मांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम विकास मंडळाने पुढाकार घेत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे फळपिकांचे क्षेत्र वाढले. याचबरोबरीने परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय या शिक्षण संस्थेच्या ‘आधार शिक्षणाचा' या उपक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली आहेत.

मांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम विकास मंडळाने पुढाकार घेत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे फळपिकांचे क्षेत्र वाढले. याचबरोबरीने परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय या शिक्षण संस्थेच्या ‘आधार शिक्षणाचा' या उपक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, शेतकऱ्यांच्यापर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच लोकसहभागातून जल-मृदा संधारणातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय ही शिक्षण संस्था करत आहे. या संस्थेने ‘आधार शिक्षणाचा' या उपक्रमाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला, मुलींना पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. निवासाची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी झाल्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला, मुलींच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. याचबरोबरीने मुख्याध्यापक नितीन लोहट यांच्या पुढाकारातून मातोश्री जिजाऊ ग्राम विकास मंडळाने मांडाखळी (जि. परभणी) शिवारात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली. यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढली आहे.

उपक्रम ‘आधार शिक्षणाचा' 

गेल्या काही वर्षांतील दुष्काळी परिस्थिती, उत्पादनातील घट, कौटुंबिक गरजांच्या पूर्ततेची विवंचना, कर्जपरतफेडीची चिंता यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून दिली जाणारी मदत तोकडी पडते. अनेक कुटुंबांपर्यंत वेळेत मदत पोचत नाही. त्यामुळे आपद्ग्रस्त कुटुंबाची आणखीच आबाळ होते. मुला-मुलींच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात. यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन लोहट यांनी ‘आधार शिक्षणाचा‘ हा उपक्रम सुरू केला. गेल्या पाच वर्षांत याअंतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना जिल्ह्यातील १२५ हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

याबाबत माहिती देताना नितीन लोहट म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयातून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची माहिती घेतली जाते. त्यानंतर जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे सदस्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतात. कुटुंबीयांच्या परवानगीनंतर पाल्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले जाते. २०१४ मध्ये पहिल्या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २८ विद्यार्थी शिक्षणासाठी जिजाऊ ज्ञानतीर्थमध्ये दाखल झाले. गेल्या चार वर्षात या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

उपक्रमाअंतर्गत दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांची संस्थेच्या वसतिगृहामध्ये राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था केली जाते. वह्या, पुस्तके तसेच अन्य शैक्षणिक साहित्य, गणवेशासह कपडेदेखील दिले जातात. शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्याख्यानांचे आयोजन केले जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. गतवर्षी दहावीच्या परीक्षेत प्रांजली देसाई हिने ९४ टक्के गुण मिळवले आहेत. विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, कवी प्रा. इंद्रजित भालेराव, पुरुषोत्तम खेडेकर, डॅा. सुनीलकुमार लवटे, मकरंद अनासपुरे, मल्हार पाटेकर आदींसह मान्यवर व्यक्तींनी जिजाऊ ज्ञानतीर्थ च्या ‘आधार शिक्षणाचा’ या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रक्षेत्रावर भाजीपाला लागवड 

  • जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटंबातील आहेत. संस्थेसाठी दररोज हजारो लिटर पाणी लागते. हे वापरलेले पाणी वाहून जाते. ते साठविण्यासाठी अस्तरीत शेततळे तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शेतीविषयक माहिती व्हावी, या उद्देशाने दोन एकर क्षेत्रावर कोबी, टोमॅटो, शेवगा, मेथी, मिरची, कोथिंबीर,पालक, कांदा, लसूण आदी भाजीपाला नैसर्गिक पद्धतीने पिकविला जातो. यामुळे निवासी विद्यार्थ्यांसाठी दररोज ताजा भाजीपाला उपलब्ध होतो.
     
  • प्रक्षेत्रावर गांडूळ खत निर्मिती सुरू करण्यात आली आहे. प्रक्षेत्रावर पपई आणि पेरूची लागवड केली आहे. विद्यार्थ्यांना पीक लागवड तंत्रज्ञान, व्यवस्थापनाची माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांना शेतमाल विक्री प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी हुरडा उत्पादनाचे नियोजन संस्थेने केले आहे.

मांडाखळी विकास अभियान 

मांडाखळी (ता. परभणी) हे नितीन लोहट यांचे गाव. त्यांनी गावाबरोबरची नाळ कायम ठेवली आहे. गावातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मांडाखळी विकास अभियान उपक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविले जातात. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे गावात पाणीटंचाई समस्या निर्माण झाली. २०१५ मध्ये मांडाखळीची जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवड झाली. गावाचा जलआराखडा तयार करण्यात आला. कृषी विभाग तसेच लोकसहभागातून गावामध्ये नाला, बंधारा खोलीकरणाची कामे झाली. लोकसहभागातून इंद्रायणी देवी माळावर खोल सलग समतल चर खोदण्यात आले. शेतामध्ये ढाळीच्या बांधाची कामे झाली. शेततळी खोदण्यात आली. जलसंधारणाच्या कामामुळे भूजल पाणी वाढण्यास मदत झाली. या कामामुळे ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजले.

मांडाखळी शिवारातून वाहणाऱ्या नाल्यांची एकूण लांबी सुमारे १२ किलोमीटर आहे. झाडे, झुडपांची वाढ झाल्यामुळे नाल्याचे पात्र अरुंद, वेडे वाकडे झाले होते. त्यामुळे पुराचे पाणी शेतजमिनीमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान होत असे. नितीन लोहट यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी यंदाच्या उन्हाळ्यात इंद्रायणी देवी माळावर खोदलेल्या सलग समतल चरातील गाळ उपसला. ओढ्याचे खोलीकरण, सरळीकरण केले. विहीर पुनर्भरणाची कामे झाली. लोकसहभाग, श्रमदान आणि शासनाकडून मिळालेले यंत्रासाठा मिळालेल्या इंधनामुळे जलसंधारणाची कामे जलद गतीने झाली. या कामांमुळे गावातील सिंचन स्रोतांची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. संरक्षित पाणीसाठ्यासाठी गावामध्ये २४ शेतकऱ्यांनी शेततळी घेतली आहेत. पाणी उपलब्धतेमुळे संत्रा,मोसंबी, सीताफळ, पेरू, लिंबू आदी फळपिकांचे क्षेत्र वाढले आहे. बाजारपेठ लक्षात घेऊन शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना 

गटाच्या माध्यमातून गावातील शेतकरी एकत्रित आले. शेतीविषयक माहिती, पीकपद्धतीबाबत प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी गावात चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. शेतकऱ्यांनी मांडाखळी फार्मर्स अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची सुरुवात केली आहे. याचबरोबरीने येत्या काळात परिसरातील गावांमध्ये सीताफळ उत्पादकांचा गट करण्यात येणार आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतमाल विक्रीसाठी विपणन साखळी तयार होत आहे. रसायन अवशेषमुक्त शेतमालाच्या विक्रीसाठी ‘फार्म टू किचन' ही संकल्पना राबविली जाणार आहे.

प्रतिक्रियाः

लोकसहभागातून विकासाला चालना
नालाखोलीकरण, सरळीकरणाच्या कामामुळे चांगल्या प्रकारे जलसंधारण झाले. विहिरीतील पाणी पातळी
वाढली. यामुळे गावात नव्याने तीस एकरांवर फळबाग लागवड झाली. मांडाखळी विकास
अभियानातील लोकसहभागामुळे शेती विकासाला चालना मिळत आहे.

- रमेश राऊत, शेतकरी, मांडाखळी

संपर्कः नितीन लोहट, ९४२२१०९०३६


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षणासाठी ‘...सोनई (ता. नेवासा, जि. नगर) येथील यशवंत सामाजिक...
जल, मृद्संधारणातून विकासाच्या दिशेनेउत्तर सोलापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाकडील...
नावीन्यपूर्ण उपक्रमांतून वनकुटेची वेगळी...नगर जिल्ह्यातील वनकुटे (ता. पारनेर) गावाची वाटचाल...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
महिला बचत गटातून पूरक उद्योगांना गतीगेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले....
‘सोशल नेटवर्किंग' मधून ग्राम,आरोग्य अन्...नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी विविध...
लोकसहभागातून ग्रामविकासाला दिशासप्टेंबर २०१५ मध्ये मी गावाच्या सरपंचपदाचा...
निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला...भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या...
रेशीम शेतीतून देवठाणाच्या अर्थकारणास गतीपरभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता. पूर्णा) येथील...
शेततळ्यांतील मत्स्यशेतीचे ‘बेडग मॉडेल’जिथं एका एका पाण्याच्या थेंबासाठी वणवण हिंडावे...
वडनेरभैरव ग्रामपालिका उचलणार मुलींच्या...नाशिक : सुरक्षेचा प्रश्न किंवा आर्थिक परिस्थिती...
लोकसहभागातून पुणतांब्याची  विकासाकडे...नगर जिल्ह्यामधील पुणतांबा (ता. राहाता) हे पौराणिक...
ग्रामपंचायत कायद्यात ‘दुरुस्ती’ करतानाच...पुणे : पंचायतराज सक्षमीकरणासाठी राज्यघटनेत ७३ वी...
‘अफार्म’ची जलनियोजनातून कृषिविकासाची...महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची मध्यवर्ती शिखर...