चिंचा विकणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात फराहनाजच्या यशाचा गोडवा

सातत्य राखल्यानं यशस्वी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना सातत्य ठेवलं. या सर्व प्रक्रियेत कुटुंबासह मित्रपरिवाराचं मोठं सहकार्य लाभलं. यापुढे स्पर्धा परीक्षांचा हा प्रवास इथंच थांबवणार नसून माझ्यासारख्या अनेक मुलींनी सेवेत यावं यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. -फराहनाज पटेल, पोलिस उपनिरीक्षक
आपल्या कुटुंबियांसमवेत फराहनाज पटेल...
आपल्या कुटुंबियांसमवेत फराहनाज पटेल...

गणूर, ता. चांदवड : स्पर्धा परीक्षा म्हटलं की पहिलं नाव येतं ते मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांचं. तेथील क्‍लासेसचं. ग्रामीण भागातून या शहरांत पुण्यात जाणं, महागडे क्‍लास हा यशाचा चाकोरीबद्ध ट्रेंड मोडणं अशक्‍यच असतं. मात्र चांदवड तालुक्यातील गणूर येथील फरहनाज पटेल या चिंचा विकणाऱ्या वडिलांच्या कन्येनं घरीच अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. इतकंच नव्हे, तर राज्यात मुलींमध्ये सहावी येऊन रोजच आंबट चिंचात रमणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात आनंदाचा गोडवा पेरला आहे. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी २०१८मध्ये परीक्षेत तिने हे यश मिळविले आहे. फराहनाजचा जन्म चांदवडसारख्या दुष्काळी तालुक्‍यातला. हंगामी शेती अन् चिंचा विक्री करणे वडील अनिस पटेल यांचा व्यवसाय. तीन मुली आणि दोन मुलांच्या शिक्षणासाठी पैसा पुरवताना आई-वडिलांची नेहमीच फरपट व्हायची. अशा परिस्थितीत दहावीपर्यंत गावच्या शाळेत शिक्षणानंतर बारावी ते पदवीपर्यंत चांदवड येथे शिक्षण केले. दरम्यानच्या काळात वडील चिंचा विक्री करायचे, घरात इतर भावंडे इम्रान, रुकसार, गुलशन या सर्वांचेच शिक्षण सुरू असल्याने आर्थिक अडचणी नित्याच्याच होत्या. शाळेत असताना स्काउट-गाइडची परेड व्यवस्थित करत नसल्याचे सांगून फराहनाजला बाहेर काढण्यात आलं होतं. तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधून शिस्तीला महत्त्व असलेल्या पोलिस सेवेत जाण्याचं स्वप्न बघितलं. मुलीला शिकवून काय करणार अशा समाजातील अनेकांच्या प्रश्‍नाला तिनं आपल्या यशातून उत्तर दिलंय. फराहनाजचा मोठा भाऊ इम्रानची देखील विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली असून, आपल्या यशाचे श्रेय ती आई-वडील, भाऊ, मामा-मामी आणि बहिणींना देते. अवघ्या तालुक्याला अभिमान... वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान फक्त फराहनाजलाच नसून, अवघ्या तालुक्‍यासाठी ती अभिमानाचा विषय ठरत आहे. शिवाय गणूर गावातील पहिलीच ‘पोलिस उपनिरीक्षक’ म्हणून मानही तिने पटकावला आहे. या परीक्षेतील तिचं यश सबंध तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरलं आहे. अन्य मुलींनीही याच वाटेनं जावं, वाटेत अडथळे, अडचणी असल्या तरी त्यावर मात करता येते. आपणदेखील स्थिर झाल्यावर अन्य मुलींना त्यासाठी प्रोत्साहन देऊ, असं फरहनाजला वाटतं. त्यासाठी आपण इतरांना मदत व दिशा दाखवण्याचं काम करत राहणार असल्याचं तिनं सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com