केळी उत्पादनात तमिळनाडूचा दबदबा

महाराष्ट्रातील क्षेत्र थोडे पाऊसमान लक्षात घेता कमी झाले आहे. राज्याचे क्षेत्र किती हे जळगाव जिल्ह्यातील स्थितीवर अवलंबून असते. उत्पादनात आपण मागे दिसत असलो तरी आपली उत्पादकता कर्नाटक, केरळ व इतर राज्यांपेक्षा चांगली असून, ती ५९ मेट्रिक टन प्रतिहेक्‍टरपर्यंत राहिली आहे. लागवड ही पाऊसमानावर अवलंबून असते. - नाझेमोद्दीन शेख, प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव ः केळी उत्पादनात देशात तमिळनाडूचा यंदा दबदबा राहिला असून, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१७-१८ मध्ये ३६०० दशलक्ष मेट्रिक टन केळीचे उत्पादन झाले आहे, तर तमिळनाडूने सर्वाधिक ५१३६.२ दशलक्ष मेट्रिक टन केळीचे उत्पादन घेऊन आपली आघाडी राखली आहे. केळी लागवडीतही कर्नाटक व तमिळनाडू आघाडीवर आहेत, तर उत्पादनात महाराष्ट्र गुजरातसह तमिळनाडूच्या तुलनेत मागे राहिल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रीय बागवानी बोर्डाने (एनएचबी) जारी केलेल्या माहितीनुसार मागील वर्षी (२०१६-१७) गुजरात देशात उत्पादनात क्रमांक एकवर राहिले होते. गुजरातेत ४१८५.५२ दशलक्ष मेट्रिक टन केळीचे उत्पादन आले होते. २०१७-१८ मध्ये मात्र गुजरात केळी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथे महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक म्हणजेच ४५२३.४९ दशलक्ष मेट्रिक टन केळीचे उत्पादन साध्य झाल्याची माहिती मिळाली.

मागील १५ वर्षांमध्ये गुजरातेत केळी लागवडीखालील क्षेत्रातही कमालीची वाढ झाली असून, ती ६४ हजार हेक्‍टरवर पोचली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत फक्त १० हजार हेक्‍टर केळी लागवड गुजरातेत कमी आहे. महाराष्ट्रात दोन वर्षे ७४ हजार हेक्‍टरवर केळीची लागवड झाली आहे. गुजरातेत सन २००१ मध्ये फक्त ३३ हजार हेक्‍टरवर केळी लागवड झाली होती. यानंतर तेथे केळी लागवडीत सतत वाढ नोंदविली गेली आहे. अलीकडे तेथील वलसाड, नवसारी व महाराष्ट्रालगतच्या भागातही केळीचे पीक जोमात घेतले जात असल्याचे सांगण्यात आले.

तमिळनाडू केळी लागवडीत देशात क्रमांक दोनवर राहिला असून, तेथे ९५ हजार हेक्‍टरवर केळी लागवड झाली, तर कर्नाटकात एक लाख एक हजार हेक्‍टरवर केळी लागवड झाली आहे.  केळी लागवडीत मध्य प्रदेशही पुढे येत असून, मागील १८ वर्षांत तेथे केळी लागवड सुमारे १० हजार हेक्‍टरने वाढून ती २८ हजार हेक्‍टरपर्यंत पोचली आहे.

देशाचे उत्पादन कमी २०१६-१७ मध्ये देशात आठ लाख ६० हजार हेक्‍टवर केळी लागवड झाली होती. उत्पादन ३० हजार ४७७ दशलक्ष मेट्रिक टन आले होते. तर २०१७-१८ मध्ये देशात आठ लाख ५७ हजार हेक्‍टरवर केळीची लागवड झाली आणि उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत कमी म्हणजेच ३० हजार २०१ दशलक्ष मेट्रिक टन आल्याची माहिती मिळाली. केरळ, कर्नाटक या राज्यांची उत्पादकता कमी असल्याने उत्पादन कमी आले आहे. तेथे भाजीची केळी अधिक घेतली जाते. त्यांची उत्पादकता हेक्‍टरी ३० मेट्रिक टनपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.

प्रमुख राज्यांमधील २०१७-१८ मधील केळीचे उत्पादन (दशलक्ष मेट्रिक टनमध्ये)
राज्ये उत्पादन
तमिळनाडू ५१३६.२
गुजरात ४५२३.४९
महाराष्ट्र ३६००.०००
आंध्र प्रदेश ३२४२.७९७
कर्नाटक २५२९.६
बिहार १७०२.४१२
मध्य प्रदेश १७०१.०००
पश्चिम बंगाल १०७७.०००
प्रमुख राज्यांमधील केळी लागवडीची माहिती दृष्टिक्षेपात (लागवड हजार हेक्‍टरमध्ये)
राज्ये  २००१  २०१७
आसाम  ४३.६  ५५.४२
बिहार २७.२   ३५.१५
केरळ   २८.१ ८१.५१
महाराष्ट्र  ५९.७ ७४.६८
तमिळनाडू ८४.६ ९४.९९
कर्नाटक ५३.१  १०१.५३
गुजरात ३३.१ ६४.६९
आंध्र प्रदेश  ५०.५  ८६.३२
मध्य प्रदेश   १८.२ २४.३१
पश्‍चिम बंगाल ३६.००  ४९.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com