बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकर

बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकर
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकर

राहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी मुळा धरणाचा आधार मिळाला आहे. थेट मुळा धरणातून १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचे दहा हजार लिटर क्षमतेचे २९८ टॅंकर दररोज भरण्यास जिल्हाधिकारी (नगर) यांनी मजुरी दिली आहे. त्यासाठी, धरणातून चार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल,’’ अशी माहिती जलसंपदा विभागाच्या ‘मुळा’चे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली. 

मोरे म्हणाले, ‘‘आष्टी (जि. बीड) शहरातील २२ व तालुक्यांतील ४४ असे ६६ टँकर भरण्याची मागणी आली आहे. टप्प्याटप्प्याने टँकरची संख्या वाढत जाईल. टँकर भरण्यासाठी जिल्हाधिकारी (बीड) यांच्यातर्फे मुळा धरणावर स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल. पाणी उचलण्यासाठी स्टॅण्डपोस्ट तयार करून, वीज पंप, व्हॉल्व्ह, जलवाहिनी अशी व्यवस्था करावी लागेल. कृषी विद्यापीठाच्या पंप हाउसजवळ थेट धरणातून पाणी उचलण्यासाठी जागा दिली जाईल. पाणीटंचाई कमी होईपर्यंत टँकर भरून दिले जातील.’’ 

‘‘धरणात आज (गुरुवार) अखेर ५९३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून, १५ जुलैअखेर मुळा धरणावरील पिण्याच्या पाणी योजना, बाष्पीभवन, गाळ वजा जाता शिल्लक चार दशलक्ष घनफूट पाणी टँकर भरण्यासाठी मंजूर केले आहे. १५ जुलैपर्यंत धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली नाही. तर चार हजार ५०० दशलक्ष घनफूट मृत साठ्यातून पिण्यासाठी पाणी उचलण्याची जिल्हाधिकारी (नगर) यांच्याकडून परवानगी घेतली जाईल.’’ 

धरणातून दोन दिवसांत अकरा टँकर भरून दिले. टँकर भरण्यासाठी नगर औद्योगिक वसाहतीच्या पंपहाउसमधून तात्पुरती व्यवस्था केली. परंतु, या योजनेचा पाणी पुरवठा विस्कळित व्हायला लागला. त्यामुळे, टँकर भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यास सांगितले आहे.  - अण्णासाहेब आंधळे, शाखा अभियंता, मुळा धरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com