टॅंकरचा धंदा जोमात; शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

द्राक्ष बागेला सुरवातीपासून टॅंकरनेच पाणी घालतोय. आता टॅंकरचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे पाणी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. शासनाने म्हैसाळ योजना किंवा कर्नाटकातून पाणी लवकरात लवकर देऊन आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. - रोहिदास सातपुते, उमदी, ता. जत.
टॅंकर पाणी
टॅंकर पाणी

सांगली ः यंदाच्या द्राक्ष हंगामात सुरवातीपासूनच टॅंकरने पाणी घालावे लागत आहे. द्राक्ष काढणीला असून पंधरा दिवस आहेत. पण पुढे बागा जगवायच्या म्हटलं तरी पाणी लागतंच. २० हजार लिटर पाण्याचा टॅंकर अडीच हजार रुपयांना मिळायचा. तोच टॅंकर आता ३५०० ते ४००० रुपयांना मिळू लागला आहे. एकरी खर्चात वाढ झाली. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष आणि डाळिंब धोक्यात आली आहेत. हंगाम संपल्यानंतर पाणी केवळ बागा जगविण्यासाठी द्यावे लागणार आहे. उत्पादन काहीच मिळणार नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जत तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र ४ हजार ८०० आहे, तर डाळिंबाचे ३ हजार ९०० हेक्टर आहे. जत तालुक्यात परतीच्या पावसाने ओढ दिली. यामुळे द्राक्ष बागा उशिरा धरल्या. जेवढे पाणी होते त्यावर बागा चांगल्या आल्या. त्यानंतर भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या ज्या कूपनलिकांना पाणी होते. ते अचानक बंद झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे.  सध्या द्राक्ष वेलीला माल चांगला आहे. जोपर्यंत माल आहे तोपर्यंत बागेला पाणी द्यावे लागते. एकरी २० ते २५ हजार लिटर दोन दिवसाला लागते. हे पाणी आणण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हुलजती, मरवडे याठिकाणाहून आणावे लागत आहे. उमदी पासून ही गावे २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहेत. याच ठिकाणाहून पाणी आणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.  मुळात जत तालुक्यातील शेतकरी बेदाणा तयार करतात. पुढे बेदाणा निर्मितीसाठी पाणी लागणार आहे. परंतु पाणी अपुरे असल्याने बेदाण्याच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. जत तालुक्यातील पूर्व भागात दोड्डानाला हा तलाव पाऊन टीएमसी क्षमतेचा आहे. मात्र, सन २००९ पासून हा तलाव कोरडा आहे. या तलावात पाणी सोडले तर वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा होताे. परंतु हा तलाव भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.   जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे काही भागात पाणी पोचले आहे. त्यामुळे उर्वरित भागात या योजनचे पाणी सोडण्याची मागणी करूनदेखील पाणी मिळालेले नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर कसा करायचा इथल्या शेतकऱ्यांना चांगलेच माहिती आहे. यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी येण्याअगोदर पैसे भरण्यास इथला शेतकरी तयार आहे. म्हैसाळच्या पाण्यासाठी शेतकरी पैसे भरण्यास तयार आहेत. परंतु या योजनेचे पाणी मिळत नाही. पावसाच्यात योजना बंद असते, वाहून जाणारे पाणी जर या तालुक्यातील तलावात भरले तर नक्कीच वर्षभर पाणी पुरेल. पण शासन आणि पाटबंधारे विभागाकडून याबाबतचे नियोजन होतच नाही.  गेल्या चार वर्षांपासून टॅंकरने बागेला पाणी गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात कमी अधिक पाऊस पडतोय. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे बागा जगविणे आणि थोडेफार आर्थिक उत्पन्न मिळण्याशिवाय दुसरा पर्याय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नाही. वर्षभर टॅंकरने पाणी द्याचे म्हटले तर एकरी १ ते दोन लाख खर्च येतोय. यंदा या खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे द्राक्षाला दिवसेंदिवस खर्चात वाढ होत असल्याने मिळणारे उत्पन्न देखील कमी होऊ लागले आहे. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com