कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन महिन्यांनंतरही मिळेना

कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांकरिता नवीन वर्षासाठी एप्रिल अथवा मे महिन्यात शासनाकडून उद्दिष्ट प्राप्त होत असते. यंदा मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनही कोणत्याच योजनांचे नव्याने उद्दिष्ट आलेले नाही.
agriculture department
agriculture department

नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांकरिता नवीन वर्षासाठी एप्रिल अथवा मे महिन्यात शासनाकडून उद्दिष्ट प्राप्त होत असते. यंदा मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनही कोणत्याच योजनांचे नव्याने उद्दिष्ट आलेले नाही. विशेष म्हणजे अजून कोणत्याही योजनांच्या लाभासाठी अर्जांची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.  शेतकऱ्यांनी शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी यांत्रिकीकरणातून यंत्रचलित व स्वयंचलित अवजारे घेण्यासाठी अनुदान दिले जाते. याशिवाय फलोत्पादन, फळबाग लागवड, कांदाचाळ, शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेडनेट, पॉलिहाउस, ठिबक सिंचन आदी वैयक्तिक; तसेच गटांसाठीच्या योजनांसाठी दरवर्षी शासनाकडून उद्दिष्ट ठरवून निधी दिला जातो. यंदा मात्र अजूनही नव्या वर्षाचे उद्दिष्ट आलेले नाही. वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दरवर्षी एप्रिल अथवा मे महिन्यातच आॅनलाइन अर्ज मागवले जातात. यंदा जून सरला तरी अजूनही अर्ज मागवलेले नाहीत. ‘कोरोना’मुळे निधीची अडचण निर्माण झाल्याने अजून उद्दिष्ट दिले नाही, असे अधिकारी खासगीत सांगतात. नगर जिल्ह्यात सर्व योजनांसाठी जवळपास शंभर कोटींपेक्षा अधिक निधी खर्च केला जातो. यंदा अजूनही कृषीच्या वैयक्तिक लाभासाठी अर्जांची मागणीच केलेली नाही, त्यामुळे यंदा लाभ मिळेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. यंदा एप्रिलमध्येच काही योजनांसाठी निधी दिला जाणार असून त्यानुसार नियोजन कळवावे, असे पत्र देण्यात आल्याने यंदा मिळणाऱ्या निधीत मोठी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पूर्ण केलेल्या कामांच्या अनुदानापोटी चाळीस कोटींपेक्षा अधिक निधीची जिल्ह्याला गरज आहे. 

तीन महिन्यांपासून नवीन कामे बंद  नगर जिल्ह्यात महात्मा फुले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड वगळता एप्रिलपासून नव्याने कृषी विभागाने एकाही कामाला मंजुरी, कार्यारंभ आदेश दिलेला नाही. मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेततलाव करण्याची मागणी आहे. नव्याने कामे सुरू केली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेततळ्यांची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाच्या योजनांबाबतचे उद्दिष्ट जुलै महिन्यात येत असते. ते या महिन्यात येईल त्यानुसार नियोजन केले जाईल. मागील वर्षीच्या झालेल्या कामांसाठी काही निधी आलेला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार नव्याने कामे सुरू करण्याला मान्यता दिलेली नाही.  - शिवाजी जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com