रत्नागिरीत २० हजार टन भात खरेदीचे उद्दिष्ट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी  : यंदा जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटिंग फेडरेशनला २० हजार टन भात खरेदीचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील १६ केंद्रांवरून भात खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी एकूण १३ हजार २९५.०५ क्विंटल भात खरेदी झाली होती. शेतकऱ्यां‍च्या सोयीसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत भात खरेदी सुरू ठेवण्यात येणार आहे.

फेडरेशनतर्फे यावर्षी सर्वसाधारण भातासाठी १८१५ रुपये तर ‘अ’ वर्गासाठी १८३५ रुपये क्विंटल असा दर देण्यात येणार आहे. गतवर्षी २५ हजार टन भात खरेदीचे उद्दिष्ट असताना, उद्दिष्टाच्या निम्मी भात खरेदी झाली होती. यावर्षी पुरामुळे तसेच ‘क्यार’ वादळानंतर झालेल्या संततधार पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाल्यामुळे खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २००९-१० मध्ये १५ हजार २४०.७३ , २०१०-११ मध्ये १५ हजार २६०.२२, २०११-१२ मध्ये १८ हजार ७३१.७८, २०१२-१३ मध्ये २१ हजार ४८०, २०१३-१४ मध्ये २४ हजार ४९८.४६ क्विंटल भात खरेदी करण्यात आला. २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षी भात खरेदी झालीच नाही. शासनाकडून लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे गोदाम मालकांनीच भात खरेदीसाठी नकार दिला होता.

२०१६-१७ मध्ये शासनाच्या परवानगीने भात खरेदी करण्यात आला होती. त्यानुसार ७७७ शेतकऱ्यांकडून ८५५६ क्विंटल भात विक्री करण्यात आली. २०१७-१८ मध्ये ८ हजार १२२.४५ क्विंटल तर २०१८-१९ मध्ये ११२२ शेतकऱ्यांनी १३ हजार २९५.०५ क्विंटल भात विक्री केला होता. यावर्षी शासनाकडून चांगला दर घोषित करण्यात आला असला तरी नुकसानीमुळे विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

खरेदीसाठीची केंद्रे खेड तालुका खरेदी विक्री संघ, गुहागर तालुका खरेदी विक्री संघ, लांजा तालुका खरेदी विक्री संघ, रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ, चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, चिपळूण आणि मिरवणे केंद्र, आकले केंद्र, शिरळ केंद्र, शिरगाव विविध कार्य सेवा सोसायटी लि. केंद्र, केळशी परिसर आंबा उत्पादक संघ, राजापूर तालुका खरेदी विक्री संघ, पाचल केंद्र, रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाचे संगमेश्वर केंद्र, दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर भात खरेदी करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com