नगर : घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्यास करामध्ये सूट

घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्यास करामध्ये सूट
घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्यास करामध्ये सूट

नगर : घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करून पावसाचे पाणी साठवून उपयोगात आणणे किंवा जमिनीत जिरवून जलपुनर्भरण करणाऱ्या व्यक्तींना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये १० टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे सरपंच सखुबाई गोंडे यांनी या वेळी सांगितले.

नेवासा तालुक्यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवारी (ता. २६) जलमित्र सुखदेव फुलारी यांचे प्रमुख उपस्थितीत व माजी सरपंच अशोक मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, सरपंच सखुबाई गोंडे, बलभीम गव्हाणे, कचरू यादव, ग्रामपंचायत सदस्य मायकल गोर्डे, अशोक वायकर, अंबादास गोंडे, बाळासाहेब वाघडकर, दादासाहेब गजरे, देवेंद्र काळे, कादर सय्यद, संजय मिसाळ, भगवान गालफाडे, रोहिदास आढागळे, आरोग्य विभागाचे डॉ. मलदोडे, आरोग्यसेविका श्रीमती खंडागळे, अंगणवाडी सेविका कुसुम फुलारी, भारत भालेराव, राहुल कोळसे, दत्तात्रय गव्हाणे, अशोक साळवे, ग्रामसेवक रेवणनाथ भिसे, विष्णू फुलारी, रामभाऊ देशमुख, रासिंकर आदींसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

या वेळी पाणी बचत व जलपुनर्भरण या विषयावर मार्गदर्शन करताना फुलारी म्हणाले, ‘‘देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला पाठबळ देण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. शाश्‍वत पाण्यासाठी केंद्र सरकार स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करीत आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करून छतावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून ठेऊन उपयोगात आणावे. तसेच शोष खड्ड्यांचा वापर करून, बोअरचे पुनर्भरण करून पावसाचे पाणी जमिनीत जिरविले पाहिजे. उपसाच्या प्रमाणात जलपुनर्भरण होईल याची काळजी घ्यावी. गावातील नळ पाणीपुरवठा करताना प्रत्येक नळाला तोटी असेल याची काळजी ग्रामपंचायतीने घ्यावी. शेतातील बोअर-विहिरींचे पुनर्भरण करावे. 

ग्रामपंचायतीने गावातील सर्व नळांना तोट्या बसवाव्यात. घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये किमान पाच वर्षांसाठी १० टक्के सूट द्यावी. या सूचनेला अनुमोदन दिले. सर्व उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून ग्रामसभेत हा ठराव एकमताने मंजूर केला.

राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील अनेक नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांनी घरपट्टी, पाणीपट्टीमध्ये १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु गावपातळीवर अद्याप कोणत्याही ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतलेला नाही. असा निर्णय घेणारी भेंडा बुद्रुक ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. राज्यातील इतर ग्रामपंचायतींना प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com